मंडणगड : बदलत्या काळात कुटुंब व्यवस्था ढासळल्याने निर्माण झालेल्या समस्येचे समाधान हजारो रुग्णांना जीवनदान देणार्या डॉ. जलील पारकर यांनी मिलन वृद्धाश्रमाच्या माध्यमातून शोधले असून, आगामी काळात वयोवृद्धांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनालाही प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मंडणगडातील टाकेडे येथे ‘हॅबीटॅट फॉर ह्युम्यानिटी फाऊंडेशन’च्या माध्यमातून व डॉ. जलील पारकर यांच्या संकल्पनेने साकारलेल्या मिलन वृद्धाश्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, निसर्गरम्य वातावरणात उभ्या राहिलेल्या मिलन वृध्दाश्रमात वयोवृध्द नागरिक निराशा व एकटेपणासून दूर रहात एका वेगळ्या परिवारात रोगमुक्त दीर्घ आयुष्य जगतील, डॉ. जलील पारकर यांनी वृद्धाश्रम तयार करण्याची संकल्पना मांडली आणि स्वतः लक्ष घालून अतिशय सुंदर व राज्यात पहिल्या पाच वृध्दाश्रमात सहभागी करता येईल असा वृध्दाश्रम उभे केले आहे. यावेळी याचा आनंद होत असताना बदलेल्या समाजव्यवस्थेत वृध्दांना जागा नसल्यांची खंत वाटते असेही ते म्हणाले.
अलीकडच्या काळामध्ये परिवार लहान झाले, त्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या काही प्रमाणात कुटुंबातील परस्पर मायेचा ओलावा देखील कमी झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रमांची गरज भासत आहे. भारतामध्ये कुटुंब संस्कृती इतकी चांगली होती की, भारतात वृद्धाश्रमाची संकल्पना ही बराच काळ नव्हती. जेव्हा समाजात अशाप्रकारचे एखादे आव्हान उभ राहते त्यावेळी त्या आव्हानाचा सामना करण्याकरता समाजातीलच कोणीतरी पुढे येतो आणि अशाच प्रकारे डॉ. जलील पारकर पुढे आले आणि त्यांनी ही व्यवस्था या ठिकाणी उभी केली. कोव्हीडच्या काळामध्ये स्वतः डॉक्टर पारकर हे कोविडमुळे अत्यंत टोकाचे आजारी होऊनही त्या काळामध्ये त्यांनी जी काही रुग्णांची सेवा केली आहे ती अतिशय वाखाणण्यासारखी आहे. अनेकांचा जीव त्या काळामध्ये डॉक्टरांनी वाचवला. आताच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये पुढच्या वीस वर्षांनी आपलं सरासरी वय 85 वर्ष होणार आहे, वयस्कर लोकांच्या समस्या त्याच्या संदर्भातल्या उपाययोजनासाठी त्यांच्याकरता काय व्यवस्था केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल असे ते म्हणाले.या कार्यक्रमास खा. सुनील तटकरे, माहीती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, गृहराज्य मंत्री योगेश कदम, आमदार भाई जगताप, आमदार प्रसाद लाड, पद्मश्री भिकूजी इदाते, माजी आ. विनय नातू, माजी आमदार सूर्यकांत दळवी, डॉ. जलिल पारकर, डॉ. आसिफ भोजानी, अॅड. उल्हास नाईक, आसिफ मामला, वजाहद खान देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. परकार म्हणाले की, मी मूळचा कोकणातील आहे, कोकणातून रोजगारासाठी कर्त्या लोकसंख्येचे मुंबई व पुणे या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. गावांतील घरे बंद आहेत. कुटुंबातील तरुण शहरात काम करतात, गावात वयोवृध्द माणसे एकटी राहतात, ही गंभीर बाब आहे. या वृध्दांना एकाकीपणाचे मोठे दुःख आहे त्यांना वेळ देण्यास कोणाकडे वेळ नाही ही बाल लक्षात घेता सहा एकरामध्ये टाकेडे या ठिकाणी मिलन वृध्दाश्रम उभा केला आहे. यामागे आईकडून मिळालेली प्रेरणा व माझ्या सर्व सहकार्यांनी दिलेली साथ अत्यंत मोलाची आहे. याकामी हॅबीटॅट फॉर ह्युम्यानिटी फाऊंडशनचे डॉ. आसिफ भोजानी, अॅड. उल्हास नाईक, वजाहद खान देशमुख यांच्यासह फाऊंडेशनचे सर्व सभासद, माझे कुटुंबीय येथील ग्रामपंचायात व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले आहे.
पूर्णपणे चॅरिटी तत्वावार टाकेडे येथे 6 एकर जागेत वृध्दाश्रम उभारण्यात आला आहे. यात वयोवृध्दांना येणार्या सर्व समस्या लक्षात घेऊन तीन वर्षे काम करुन वातानुकुलित आश्रम उभा राहिला आहे. येथील निसर्गरम्य वातावरणात आंबा, काजू, नारळ, केळी, सिताफळ यांची 750 झाडे तसेच अनेक फुलझाडे लावून त्यांचे जतन केले आहे. वयोवृध्दांचे येथील आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही डॉ. परकार यांनी स्पष्ट केले.
आईकडून मिळालेली प्रेरणा व सहकार्यांच्या मदतीने कोकणातील वृद्धांची सोय मिलन वृद्धाश्रमाच्या माध्यमातून केली जाणार आहे. वयोवृद्धांचे आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.-डॉ. जलील पारकर, हॅबीटॅट फॉर ह्युम्यानिटी फाऊंडेशन