रत्नागिरी : पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, ढोल, लेझीमच्या संगतीने गुरुवारी सकाळी ग्रंथ दिंडीने मराठी भाषा गौरव दिन उत्सवास प्रारंभ करण्यात आला. भाषा जगवायची असेल तर दैनंदिन जीवनामध्ये तिचा वापर वाढविला पाहिजे, असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी उद्घाटक म्हणून केले.
महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी भाषा समिती आणि रत्नागिरी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आज मराठी भाषा गौरव दिन आणि कवी कुसमाग्रज जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. उत्सवाचे उद्घाटन येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात झाले.
कार्यक्रमाला कोमसापचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव मराठी भाषा समिती शुभांगी साठे, पोलिस उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, मुख्याधिकारी तुषार बाबर, गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ बाबासाहेब परुळेकर, जया सामंत आदी उपस्थित होते.
कीर यांनी केंद्र व राज्य शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले. कवी कुसुमाग्रजांची 113 वी जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केली जात आहे. आपल्या मराठी साहित्य व वाङमयाची प्राचीन परंपरा आहे. हे साहित्य आपण जतन केले पाहिजे. दैनंदिन व्यवहारात मराठीतून संवाद साधताना आपण संकोच बाळगतो, हा न्यूनगंड आपण काढून टाकला पाहिजे. भाषा टिकविण्याची व समृध्द करण्याची आपली जबाबदारी आहे, असे अध्यक्षीय भाषणात कीर यांनी सांगितले.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीमती गायकवाड म्हणाल्या, जनतेसमोर पोलीस खात्याची प्रतिमा अतिशय कठोर असते. वाचन, लेखन यासाठी अनेकदा वेळ कमी मिळतो. अलिकडच्या काळात मोबाईल व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पाश्चात्य देशांतील काही गोष्टिींचे अंधानुुकरण केले जात आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. तरुणांमध्ये वाचनाची आवड कमी होत असून, आपली भाषा व संस्कृती जोपासण्याची जबाबदारी आजच्या पिढीने पार पाडली पाहिजे.
उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव मराठी भाष समिती श्रीमती साठे यांनी, मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी 26 व 27 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.
यावेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे शिक्षण घेत असताना लंडनमध्ये मराठी मंडळ स्थापन करणार्या तीर्था उदय सामंत हिचा विशेष गौरव करण्यात आला. लंडनमध्ये मराठी मंडळ स्थापन करण्याचे मुख्य कारण आपले मराठी भाषेवरील प्रेम आहे. मराठी भाषेची गोडी आई जया सामंत व वडील डॉ. उदय सामंत तसेच शाळेतील मराठी भाषेच्या शिक्षकांमुळे लागली, असे तीर्था सामंत हिने सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन पाटील यांनी केले.