Uday Samant on Manoj jarange patil pudhari photo
रत्नागिरी

Uday Samant Maratha OBC Reservation : ओबीसींवर अन्याय न होता मराठा समाजाचा प्रश्न सोडवू : उदय सामंत

जरांगेंच्या आंदोलनात समन्वयाची भूमिका बजावली; ९० दिवसांनंतर पुन्हा आंदोलनाची वेळ येऊ नये ही सरकारची भूमिका

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य प्रश्नांवर ओबीसी समाजावर अन्याय न होता तोडगा काढण्याची सरकारची भूमिका आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या काळात सरकारसाठी समन्वयाची भूमिका घेतली आणि त्याला यश आले. आता ९० दिवसांनंतर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाचा आपण साक्षीदार असल्याचे सांगत सामंत म्हणाले, सरकारने सर्व नेत्यांशी संपर्क साधून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. जरांगे यांच्याशीही आपण समन्वयाची भूमिका बजावली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वातावरण बिघडू नये, यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. सरकारच्या विनंतीला त्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे या प्रक्रियेत सरकारची भूमिका यशस्वी झाली. मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकार कटिबद्ध आहे. मात्र त्यासाठी ओबीसी समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. ओबीसी समाजामध्ये काही गैरसमज असतील तर त्यावर मार्ग काढला जाईल. ओबीसी प्रश्नांवर सविस्तर बैठक घेण्यात यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच गैरसमज दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीही बैठक घ्यावी, अशी विनंती केली आहे. ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मार्ग काढला जाईल, असेही ते म्हणाले.

पाच सॅटेलाईटची निर्मिती करणार

राज्य सरकार पाच सॅटेलाईट तयार करण्याच्या दिशेने काम करीत असून त्यासाठी सुमारे १८ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. या सॅटेलाईटचा उपयोग कृषी, उद्योग, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, शहरी नियोजन व आरोग्य नियोजनासारख्या क्षेत्रांना होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर योग्य ती मदत महाराष्ट्र सरकार करेल. अधिवेशनाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे सामंत यांनी सांगितले.

न्यायालयीन प्रकरणांवर बोलणार नाही

संजय राऊत तसेच दिशा सालियन प्रकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर सामंत यांनी न्यायालयीन बाब असल्याचे सांगत भाष्य करण्यास नकार दिला. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्यायालयीन प्रकरण सुरू असताना कोणाच्या संदर्भात बोलू नये, ही एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे. समोरच्याने काहीही बोलले तरी वैयक्तिक पातळीवर मी आणि माझा पक्ष त्यावर बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांनी 'संकटमोचक' म्हणून विचारलेल्या प्रश्नावर सामंत यांनी मिश्कील टिप्पणी केली. 'संकटमोचक नाही, सध्या मोदकाचा जमाना आहे,' असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT