Uday Samant 
रत्नागिरी

Uday Samant| ओबीसींवर अन्याय न होता मराठा समाजाचा प्रश्न सोडवू : उदय सामंत

जरांगे यांच्या आंदोलनात समन्वयाची भूमिका बजावली; ९० दिवसांनंतर पुन्हा आंदोलनाची वेळ येऊ नये ही सरकारची भूमिका

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य प्रश्नांवर ओबीसी समाजावर अन्याय न होता तोडगा काढण्याची सरकारची भूमिका आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या काळात सरकारसाठी समन्वयाची भूमिका घेतली आणि त्याला यश आले. आता ९० दिवसांनंतर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाचा आपण साक्षीदार असल्याचे सांगत सामंत म्हणाले, सरकारने सर्व नेत्यांशी संपर्क साधून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. जरांगे-पाटील यांच्याशीही आपण समन्वयाची भूमिका बजावली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वातावरण बिघडू नये, यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. सरकारच्या विनंतीला त्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे या प्रक्रियेत सरकारची भूमिका यशस्वी झाली, असे सामंत यांनी नमूद केले.

मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकार कटिबद्ध आहे. मात्र, त्यासाठी ओबीसी समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. ओबीसी समाजामध्ये काही गैरसमज निर्माण झाले असतील तर त्यावर मार्ग काढला जाईल. ओबीसी प्रश्नांवर सविस्तर बैठक घेण्यात यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच गैरसमज दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीही बैठक घ्यावी, अशी विनंती केली असल्याचे सामंत यांनी सांगितले. ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मार्ग काढला जाईल, असेही ते म्हणाले. राज्य सरकार पाच सॅटेलाईट तयार करण्याच्या दिशेने काम करीत असून त्यासाठी सुमारे १८ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. अधिवेशनाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे सामंत यांनी सांगितले.

न्यायालयीन प्रकरणांवर बोलणार नाही

संजय राऊत तसेच दिशा सालियन प्रकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर सामंत यांनी न्यायालयीन बाब असल्याचे सांगत भाष्य करण्यास नकार दिला. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्यायालयीन प्रकरण सुरू असताना कोणाच्या संदर्भात बोलू नये, ही एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे. समोरच्याने काहीही बोलले तरी वैयक्तिक पातळीवर मी आणि माझा पक्ष त्यावर बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांनी 'संकटमोचक' म्हणून विचारलेल्या प्रश्नावर सामंत यांनी मिश्कील टिप्पणी केली. 'संकटमोचक नाही, सध्या मोदकाचा जमाना आहे,' असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT