चिपळूण : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला दिवसेंदिवस जनआंदोलनाचे स्वरूप येत आहे. मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या या आंदोलनात हजारो-लाखो मराठा बांधव सहभागी होत असून, अखिल भारतीय मराठा महासंघानेदेखील यात सक्रीय सहभाग घेतला आहे.
रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संदीप सावंत आपल्या सहकार्यांसह आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाचा जोरदार पाठिंबा व्यक्त केला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत महासंघाचा संघर्ष सुरू राहील, असे सावंत यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली आहे की, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे. मात्र, सरकार या मागणीवर वेळकाढूपणा करत असून, अनेकदा दिशाभूल केली गेल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. त्यामुळेच त्यांनी थेट मुंबई गाठत आझाद मैदानावर उपोषण सुरू केले. गणेशोत्सवासारख्या सणासुदीच्या काळात सुरू झालेल्या या आंदोलनाला कमी प्रतिसाद मिळेल, असा सरकारचा अंदाज होता. परंतु उलटच घडले असून, उपोषणाला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत आहे. सुरुवातीपासूनच अखिल भारतीय मराठा महासंघाने या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील कार्यकर्त्यांनी आंदोलनात उतरून जरांगे पाटील यांच्या मागण्यांचे समर्थन केले.