दापोली : दापोली तालुक्यातील असोंड गावात निसर्गाच्या कुशीत वसलेले ‘माणकेश्वर शिवमंदिर’ हे परिसरातील भाविकांचे श्रद्धस्थान बनले आहे. हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास या मंदिराला आहे. जागृत देवस्थान असल्याने श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. हे मंदिर पांडवकालीन आहे असे देखील काही ग्रामस्थ सांगतात.
शिवलिंग, नंदी, मंदिराला काळ्या दगडाचे कोरीव खांब अन्य पुरातन देवी-देवतांच्या मूर्ती यातून हे मंदिर किती पुरातन आहे त्यांची साक्ष हे मंदिर आजही देत आहे. पूर्वी या मंदिरा सभोवताल असलेली गर्द झाडी आणि मंदिरात असलेली निरागस शांतता या मंदिरात जाणार्या भक्ताला त्यातून वेगळीच अनुभूती मिळत होती असे आजही काहीजण सांगतात. त्यामुळे पूर्वी एक दुसरा माणूस मंदिरात जाण्यास धजत नव्हता. मंदिराशेजारी पावसाळ्यात खळखळ वाहणारा ओढा, बारमाही पाण्याने भरलेली पुरातन विहीर हा सगळा देखावा भक्तांचे मन प्रसन्न करून टाकतो. मंदिर पुरातन असल्याने असोंड गावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि या पुरातन ठेव्याला नवसंजीवनी दिली. दापोली, पांगारी या मुख्य मार्गावर उर्फी गावात जाताना हे मंदिर अगदी रस्त्यापासून 1 कि.मी. अंतरावर आहे. मंदिराच्या सभोवताल घनदाट जंगल असल्याने या जंगलात काही औषधी वनस्पती ही आहेत.
श्रावण महिण्यात सोमवारी असोंड गावातील पड्याळ वाडीतील ग्रामस्थ या मंदिरात सत्यनारायणाची महापूजा घालतात तर महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठा उत्सव होते. असोंड ग्रामस्थांनी मंदिराला नवसंजीवनी दिल्याने आता या मंदिरात पर्यटकांसह भाविकांचा ओढा देखील वाढला आहे. एक जागृत देवस्थान म्हणून मंदिराची ख्याती दूरवर पसरली आहे. तर असोंड गावचे आणि परिसरातील लोकांचे श्रद्धेचे स्थान हे माणकेश्वर मंदिर आहे.
या माणकेश्वर शिव मंदिराला कोंढे गावातून इतिहास आहे. हे मंदिर उभारले गेले त्या कालखंडात त्याच्या काही पाऊलखुणा कोंढे गावात आहेत. कोंढे गावातील, टाका या ठिकाणी जलकुंड आहे.आणि काही पावलांचे निशाण देखील आहेत.त्यामुळे या परिसराला मोठा इतिहास आहे.चंद्रकांत पड्याळ, असोंड, दापोली