चिपळूण : दिल्लीतील कर्तव्यपथ (राजपथ) येथे 26 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या दिमाखदार सोहळ्यात यंदा कोकणच्या कला, संस्कृती आणि कर्तृत्वाचा विशेष गौरव होणार आहे. ‘वंदे मातरम’ या भव्य सांस्कृतिक सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून घेण्यात आलेल्या निवड चाचणीतून चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवण येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत थेट राष्ट्रीय व्यासपीठ गाठले आहे.
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथील चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी दिनार संजय नेरुरकर तसेच द्वितीय वर्षाचा सुजल शितल वाडकर यांची महाराष्ट्र राज्याच्या प्रतिनिधी संघामध्ये निवड झाली आहे. या संघामार्फत हे विद्यार्थी दिल्लीतील कर्तव्यपथावर ‘वंदे मातरम’चे सादरीकरण करणार असून, महाराष्ट्रासह कोकण विभागाचा नावलौकिक वाढवणार आहेत.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही चिपळूणचेच श्री. सागर अंकुश कुंभार हे महाराष्ट्र संघाचे टीम मॅनेजर म्हणून दिल्ली येथे कार्यरत असणार आहेत. सलग दुसऱ्या वर्षी चिपळूण तालुक्याला मिळालेला हा मान संपूर्ण कोकण विभागासाठी अभिमानास्पद ठरत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत तसेच आमदार शेखर निकम यांनी दूरध्वनीवरून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, तालुक्यातील व जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या चमूचे कौतुक करत त्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या यशामागे कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण येथील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम तसेच प्राचार्या डॉ. शमिका चोरगे यांचे मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य आणि प्रेरणा लाभली. सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी ही निवड सार्थ ठरवली आहे.
दिल्लीच्या कर्तव्यपथावर ‘वंदे मातरम’च्या सादरीकरणातून महाराष्ट्राचा आणि कोकणचा डंका नक्कीच गाजेल, असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त केला जात असून, चिपळूण तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.