दापोली : मांदिवली येथील पुलावरून अवजड वाहनांची बेछूट वाहतूक सुरू असून, पुलाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फक्त 18 टन वहनक्षमतेचा हा पूल रोज 30 टनांहून अधिक क्षमतेचे डंपर सहन करत असून पुलावर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे पुलाची अवस्था डळमळीत होत असल्याचे चित्र दिसत आहे.
रोजगार व वाहतुकीच्या नावाखाली या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू आहे. पुलावर होणार्या या अतिताणामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात वारंवार आवाज उठवूनही ही वाहतूक नियंत्रणात येत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
पुलाचे अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून आम्ही संबंधित बांधकाम विभागाला याबाबत कळविले आहे. मात्र कारवाई करण्याचा अधिकार परिवहन विभागाकडे असल्याचे सांगत जबाबदारी झटकण्यात येत आहे.भावेश कारेकर, सामाजिक कार्यकर्ते, केळशी
ग्रामस्थांच्या सततच्या पाठपुराव्यानंतरही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने लोकांत नाराजी उसळली आहे. “पूल जमीनदोस्त झाल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, नागपूर अधिवेशनात हा विषय मांडण्यासाठी येथील नागरिक विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत.