मंडणगड : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सेनेच्या 6-0 अशा विजयानंतर तालुक्यातील या निवडणुकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाचा करिष्मा प्रभावी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदारांचा विकासाचा आश्वासक व सर्वसमावेशक प्रभावी चेहरा, त्यांच्या माध्यमातून झालेली व भविष्यात होणाऱ्या विकासकामांचा जाहीरनामा उमेदवारांनी मतदारांसमोर मांडल्याने खऱ्याअर्थाने या यशाचे गमक असल्याचे म्हणता येईल. त्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीही मेहनत आहे, पण या निवडणुकीत आमदार योगेश कदम यांच्यावरील विश्वासार्हतेसारखे प्रभावी नेतृत्व विरोधकांकडे नसल्याचेही यानिमित्ताने प्रकर्षाने समोर आले. दरम्यान, राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनंतरच्या काळातील स्थानिक पातळीवरील मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे, ही उत्कंठा यानिमित्ताने संपुष्टात आली असून तालुक्यात क्रमांक एकचा पक्ष म्हणून शिवेसेना पुढे आली आहे.
तालुक्यातील प्रबळ दावेदार असलेल्या असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही राजकीय पक्षांनी युती, आघाड्यांच्या माध्यमातून या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीने ठाकरे शिवसेना व मनसेला सोबत घेत आघाडी करून शिवसेना, आरपीआय (ए) युतीसमोर आव्हान उभे केले. परिणामी, ही निवडणूक एका अर्थाने आमदार गट विरुद्ध खासदार गट अशी राजकीय वर्चस्वाची लढत असल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी सेनेने पंचायत समितीवर आपले वर्चस्व कायम ठेवले असले तरी 2017 च्या निवडणुकीत पंचायत समिती व जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षांच्या समान जागा निवडून आल्याने तालुक्यात राष्ट्रवादी व शिवसेनेची ताकद समसमान असल्याचे सिद्ध झाले होते. नंतरच्या काळातील अनेक स्तरांतील निवडणुकांमध्ये अशीच ताकद तालुक्यात पाहायला मिळाली. यावेळी मात्र सेनेने पंचायत समितीवर केवळ आपली सत्ता अबाधीत ठेवली नाही तर विरोधकांचा सुपडा साफ करीत क्रमांक एकचा पक्ष म्हणून तालुक्यात निर्विवाद स्थान पटकावले आहे.
तालुक्यात दोन जि. प. गट व चार पं. स. गणासाठी असलेल्या या निवडणुकीत इस्लामपूर, बाणकोट गट व गणातील निवडणूक अत्यंत चुरशीची होती. येथील निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष होते. मात्र, शिवसेनेच्या लाटेसमोर विरोधकांचा निभाव लागला नाही. त्यामुळे एकूणच निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला मोठा धक्का असल्याचे बोलले जाते.
तालुक्यात विविध पक्षांचे पारंपरिक मतदार असतील, अशी मते मांडली जात होती. मात्र शिवसेनेच्या विकासाच्या पॅटर्नपुढे ती टिकू शकली नाहीत. राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपने स्वबळावर तर काँग्रेसने वंचित सोबत आघाडी करत निवडणुकीत काही ठिकाणी आपले उमेदवार उभे केले. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेली जुळवाजुळव प्रबळ असलेल्या प्रादेशिक पक्षांच्या झंजावातात फेल ठरणारी होती. त्या नेमाने गेल्या काही वर्षांत राज्याच्या राजकारणातील बदलत्या स्थितीत सेनेने राजकारणातील पोकळी भरून काढली व त्याची परिणीती या निवडणूक निकालातील त्यांच्या वाढलेल्या टक्केवारीत दिसून आली आहे.
मतदानाची तुलनेने कमी सरासरी, बाहेरील मतदारांचे अनुपस्थित राहणे, तसेच प्रचारकाळात सक्रिय झालेले विविध अंतर्गत व फॅक्टर या कोणत्याही बाबींचा निकालावर परिणाम झाला नाही. सुरुवातीपासून तालुक्यात प्रबळ असलेल्या शिवसेनेला समविचारी पक्षांचे सर्वपक्षीय आघाडी मोठे आव्हान देईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात अशी आघाडी एकत्र येऊ शकली नाही. एकंदरीत आठ वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेने मागील निवडणुकीतील समसमान संख्येतून सुरू होत या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.