विनोद पवार
मंडणगड : तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील शेती हा आर्थिक स्थैर्याचा महत्त्वपूर्ण पर्याय ठरू शकतो. जून आणि ऑगस्ट महिन्यांतील सुमार पाऊस, सप्टेंबरमधील पावसाची दडी यामुळे आगामी हंगामाबाबत चिंता व्यक्त होत असली तरी जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील नदी, धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून धरणक्षेत्रातील ओलिताखालील जमिनीवर दुबार पेरणी, भाजीपाला आणि कलिंगडासारख्या नगदी पिकांची लागवड करता येणे शक्य आहे. यातून व्यवसायाभिमुख शेतीची संकल्पना साधत अर्थकारणाचा मोठा आधार येथील शेतकऱ्यांना साध्य करता येऊ शकतो.
तालुक्यात तिडे, चिंचाळी, भोळवली, तुळशी आणि पणदेरी अशी पाच धरणे आहेत. या धरणांच्या परिसरातील ओलिताखालील जमिनींचा रब्बी हंगामातील शेतीसाठी उपयोग करण्याची संधी नक्कीच आहे. विशेषतः नदी व धरणक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात भाजीपाला, कडधान्ये आणि बाजारपेठेची मागणी असलेल्या पिकांच्या लागवडीचा विचार केल्यास पावसाळ्यानंतरही शेतीतून उत्पन्न मिळवण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. राज्यातील पर्जन्यमानातील तूट आणि पावसातील दीर्घ खंड लक्षात घेऊन शासनाने खरीप २०२६ हंगामात काही तालुक्यांमध्ये ट्रिगर- १ अंतर्गत दुष्काळविषयक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. राज्यातील बदलती पर्जन्यस्थिती लक्षात घेता स्थानिक पातळीवरही शेतीचे नियोजन महत्त्वाचे आहे.
तालुक्यातील भाजीपाल्याची गरज मोठ्या प्रमाणात बाहेरील बाजारपेठांमधून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून असते. असे असले तरी तालुक्यातच भाजीपाला व अन्य बाजारपेठेस अनुकूल पिकांचे उत्पादन वाढविणे व त्यांच्या व्यावसायिकतेतून आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी आता येथील शेतकऱ्यांनी कंबर कसली पाहिजे, तालुक्यात याआधी मोठ्या प्रमाणात होत असलेली रब्बी हंगामातील भाजीपाला शेती बदलत्या जीवनपद्धतीच्या काळात मात्र फारच अंशतः राहिली. या हंगामातील शेतमालासाठी तालुका पूर्णपणे परावलंबी झाला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी सद्याच्या दुष्काळजन्य स्थितीत तरी कृषी क्षेत्रात एक पावूल पुढे टाकून स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे.
नियोजनबद्ध व्यावसायिक दृष्टिकोनातून रब्बी हंगामातील शेती केल्यास त्यातून स्वयंपूर्णता नक्कीच साधता येऊ शकते. समूह शेती हाही त्यासाठी पर्याय खुला असू शकतो. खरे तर शेतीतून स्थानिक पातळीवर चांगले अर्थकारण दडलेले आहे, प्रशासनाच्या साथीने विविध उपायोजनांसह केलेली शेतीचा मार्ग समृद्धतेकडे नेणारा आहे. तालुक्यात दरवर्षी तिडे परिसरात कलिंगडाच्या शेतीतून शेतकऱ्यांनी साधलेले आर्थिक स्थैर्य हे त्याचे उदाहरण देता येईल. मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीसारख्या बाजारपेठ व स्थानिक पातळीवर कलिंगडाच्या विक्रीतून या शेतकऱ्यांनी साधलेली शेतीतील समृद्धता ही आदर्शवत म्हणता येईल. दुष्काळी परिस्थितीची तीव्रता कमी करण्यासाठी रब्बी शेतीला नवसंजीवनी देणे खरे तर आवश्यक आहे.