चिपळूण शहर : पुढारी वृत्तसेवा
चिपळूण तालुक्यातील मांडकी गावाने तब्बल ३५ वर्षांपासून सुरू असलेले मतभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा गावात साडेतीन दशकांनंतर एकत्रितपणे दसरा साजरा होणार असून, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
'एक गाव, एक विचार, एकजूट आणि एकच जल्लोष' या भावनाेतून गावाने सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. विविध कारणांमुळे मांडकी गावात गेल्या अनेक वर्षांपासून दोन गट निर्माण झाले होते. परिणामी दसरा, महाशिवरात्र आणि शिमगासारखे पारंपरिक धार्मिक सण एकत्रितपणे साजरे करण्यात अडचणी येत होत्या.
मात्र, गावाची एकजूट आणि सामाजिक सलोखा महत्त्वाचा असल्याची जाणीव झाल्यानंतर दोन्ही गटांनी जुने मतभेद विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. गावातील एकजूट प्रस्थापित करण्यासाठी उपसरपंच संतोष खैर, खोत नारायण खैर,
मांडकी बुद्रुकचे सरपंच अनंत खांबे, पोलिस पाटील सचिन खैर, मांडकी खुर्दचे सरपंच सोनू धुमक, पोलिस पाटील संजय धुमक, संदीप खांबे, डॉ. ज्ञानेश्वर खांबे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक आणि अन्य मान्यवरांचे सहकार्य लाभल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मांडकी गावाशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असलेले चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी गावातील ३५ वर्षांचे मतभेद दूर होऊन ग्रामस्थ एकत्र आल्याची माहिती मिळताच दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन केले. गावांची एकजूट कायम ठेवून परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.