रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील एका गावात आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला चिपळूण येथील विशेष न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. फईम अब्दुल्ला तांबे (रा. चिपळूण) असे या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने दिलेल्या या कठोर निर्णयामुळे पीडित बालकाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, समाजात कडक संदेश गेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ९ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी आठ वर्षांचा पीडित मुलगा मित्राची वाट पाहत असताना आरोपी फईम तांबे याने त्याचे तोंड व हात रुमालाने बांधून त्याला शेतात नेले आणि त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच, घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर ११ जानेवारी रोजीही खेळत असताना आरोपीने पीडित मुलाला जवळच काम सुरू असलेल्या इमारतीत नेऊन पुन्हा अत्याचार केला.
पीडित मुलाच्या मित्राने ही बाब नातेवाईकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
या खटल्याची सुनावणी चिपळूण येथील विशेष न्यायालयात मंगळवारी (दि.२८) पार पडली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रफुल्ल साळवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. या प्रकरणात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले; ज्यामध्ये पीडित बालक आणि त्याच्या मित्रांची साक्ष अत्यंत निर्णायक ठरली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बी. आय. नाईकवाडे यांनी केला, तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण यांनी काम पाहिले.
अंतिम सुनावणीनंतर विशेष न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी आरोपी फईम तांबे याला दोषी ठरवत जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिन्यांची सक्त मजुरी भोगावी लागेल, असेही निकालात नमूद केले. जुलै २०२६ या एकाच महिन्यात चिपळूण सत्र न्यायालयाने दिलेली ही दुसरी जन्मठेपेची शिक्षा आहे.