रत्नागिरी : महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असून तुमच्या गॅसचा सप्लाय बंद न होण्यासाठी मदत करतो, अशी बतावणी करत प्रौढाची तब्बल साडेसहा लाखांची फसवणूक केली. ही घटना ४ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते ४ वा.कालावधीत सिध्दिविनायक नगर शिवाजीनगर येथे घडली. याबाबत रमेश विश्राम खापरे (५४, रा. सिध्दीविनायक नगर, शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी दुपारी त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताने फोन करुन मी महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असून तुमचा गॅस सप्लाय बंद होणार आहे, आम्ही तुम्हाला मदत करतो असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या अज्ञाताने फिर्यादीच्या मोबाईलवर ‘महानगर गॅस बी उपडेट’ नावाची ॲप्लीकेशन फाईल पाठवून ती फाईल फिर्यादीला ओपन करण्यास लावली.
तसेच फिर्यादीच्या डेबीट कार्डची माहिती भरण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यातून तब्बल ६ लाख ४८ हजार ६१२ रुपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(क), ६६(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.