Ratnagiri Police Drugs Bust
रत्नागिरी : शहरानजीकच्या काजरघाटी धार परिसरात गस्त घालत असताना रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका संशयिताला २ किलो १०० ग्रॅम गांजासह अटक केली. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. संशयिताकडून गांजा व दुचाकी असा एकूण १ लाख ८० हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
इम्रान मोहम्मद काझी (रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
मंगळवारी सायंकाळी गुन्हे प्रकटीकरण पथक काजरघाटी धार परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी शाईन दुचाकी (एमएच-०८-बीबी-६७३६) वरून एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आली. पथकाने त्याला थांबवून चौकशी केली. त्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.
पोलिसांनी गांजा तसेच संबंधित दुचाकी असा एकूण १ लाख ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, संशयिताविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी अरांक्षा यादव, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अभिजित थोरात, पोलिस निरीक्षक विवेक पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस कर्मचारी दिपू साळवी, शांताराम झोरे, अमित पालवे, दिनेश आखाडे आणि भालचंद्र मयेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.