रत्नागिरी

Ratnagiri News | मालगुंडमध्ये १६० कोटींच्या प्राणी संग्रहालयाला प्रशासकीय मान्यता

पर्यटनाला मोठी चालना अपेक्षित : उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यातील पर्यटन आणि जैवविविधतेला नवे बळ देणारा मालगुंड येथील भव्य प्राणी संग्रहालय प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे. तब्बल १६० कोटी २७ लाख ६७ हजार ७०८ खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली असून ‘सिंधुरत्न समृद्ध योजना’ अंतर्गत त्याची अंमलबजावणी होणार आहे. याबाबतची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

मालगुंड येथे प्राणी संग्रहालयासाठी सुमारे २५.४९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून त्यासाठी मूळ जमीनमालकांना सुमारे ४.२८ कोटींचा मोबदला देण्यात आला आहे. सध्या या जागेच्या सुरक्षेसाठी भिंतीचे काम सुरू असून त्यासाठी २१.७३ कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी ७ कोटींचा निधी आतापर्यंत वितरित करण्यात आला आहे. प्रकल्पासाठी एकूण सुमारे १६० कोटी २८ लाखांचा निधी नियोजित करण्यात आला आहे. यापैकी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून ६०.७५ कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली असून उर्वरित निधी आणि ‘सिंधुरत्न समृद्ध योजना’ अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हा परिषदेऐवजी एमआयडीसी करणार काम

प्राणी संग्रहालय प्रकल्पाची अंमलबजावणी सुरुवातीला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत होणार होती. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांत्रिक मान्यता घेतल्यानंतर कामाला सुरुवात होणार होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे अखेरीस या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाला अधिक वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT