सदानंद चव्हाण ,सिद्धेश कदम file photo
रत्नागिरी

गुहागरमध्ये उमेदवारीसाठी महायुतीत 'धुसफुस'

Guhagar Assembly constituency | शिंदेंची शिवसेना व भाजपा आमने-सामने

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण: गुहागर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे भास्कर जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना महायुतीला अद्याप विरोधी उमेदवार मिळालेला नाही.(Guhagar Assembly constituency)

गुहागरमध्ये महायुतीचा उमेदवार कोण?   

एकीकडे भाजपातर्फे माजी आ. विनय नातू यांनी जोरदार तयारी केली असून दुसरीकडे शिंदे सेनेकडून विपुल कदम यांचे नाव पुढे आणले जात आहे, तर काही कार्यकत्यांमध्ये शिंदे सेनेकडून सदानंद चव्हाण आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे द्वितीय पुत्र सिद्धेश कदम यांच्या नावाची चर्चासुद्धा रंगू लागली आहे.

त्यामुळे गुहागरमध्ये महायुतीचा उमेदवार कोण? याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार निश्चित केले आहेत. अद्याप उमेदवारांची कुणीच घोषणा केली नसली तरी नेत्यांकडून त्या-त्या मतदारसंघात आपापल्या लोकांना 'कामाला लागा' असे आदेशदेखील दिले आहेत.

श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांचे नाव चर्चेत 

गुहागरमध्ये शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांची उमेदवारी सद्यः स्थितीत निश्चित मानली जात आहे. सद्यःस्थितीत गुहागर विधानसभा मतदारसंघातून माजी आ. डॉ. विनय नातू यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. डॉ. नातू हे भास्कर जाधव यांच्याविरोधात लढताना तीनवेळा पराभूत झाले आहेत. आता चौथ्यावेळी भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे, असा दावा करीत आहेत.

शिवसेना (शिंदे गट) या पक्षातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांचे नाव गुहागर विधानसभा मतदारसंघात चर्चेत आले आहे. त्यांनी मतदारसंघात बॅनरबाजी देखील केली आहे. या शिवाय मोठ्या गजबजलेल्या ठिकाणी कार्यालयही उघडले आहे.

उदय सामंतांच्या वक्तव्याने मतदारसंघात सस्पेन्स

डॉ. नातू आणि विपुल कदम हे महायुतीकडूनच काम करीत असून महायुतीचे नेते आपल्याला जो आदेश देतील तोच आपण पाळू असेही सांगत आहेत. विपुल कदम हे मतदारसंघात सक्रिय झाल्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी तोफ डागली, नातेवाईकांना उमेदवारी दिली तर पराभव होईल, असे जाहीर वक्तव्यदेखील केले. दुसऱ्या बाजूला पालकमंत्री उदय सामंत यांनीदेखील गुहागरमधून शिवसैनिकच लढेल. विपुल कदमांसंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो आहोत, असे जाहीर करून या मतदारसंघात सस्पेन्स वाढविला आहे.

सदानंद चव्हाण व सिद्धेश कदम यांचे नाव चर्चेत

शिवसेना नेते रामदास कदम यांनी विपुल कदम यांचा गुहागरशी संबंध काय, असा थेट सवाल केला. या नंतर महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे. आघाडीच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण? या मुद्यावर महायुतीमध्येच रणकंदन सुरू आहे.

त्यानंतर चिपळूणचे माजी आमदार व शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांच्या नावाचीदेखील चर्चा गुहागरसाठी केली जात आहे. त्यांनी दोनवेळा चिपळूणमधून आमदारकी भूषविली. शिवाय त्यांचे मूळ गाव पाटपन्हाळे आहे. तसेच शिवसेना नेते रामदास कदम यांचे द्वितीय पुत्र आणि एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनादेखील गुहागरमधून उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT