रत्नागिरी : भाऊबीज सणाच्या दिवशीच शहरातील के. सी. जैन नगर परिसरातील महालक्ष्मी मिनी मॉल या दुकानाला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत १ कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने तब्बल ५ तास केलेल्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले होते. या मिनी मॉलसह सागर वृत्तपत्राचे कार्यालय, वनिता गिफ्ट शॉपीलाही या आगीच्या झळा बसून त्याचेही मोठे नुकसान झाले.
बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास महालक्ष्मी मिनी मॉल या दुकानातून अचानकपणे धूर आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. ही बाब मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने याबाबत रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले; परंतु या दुकानाला लागलेली आग इतकी भीषण होती की, आतमधील खेळणी, प्लास्टिक व इतर ज्वलनशील साहित्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. नगर परिषदेचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते; परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे आग आटोक्यात आणण्यात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे प्रशासनाकडून नजीकच्या भागांतून पाण्याचे अतिरिक्त टँकर्स मागवण्यात आले होते. नगर परिषद अग्निशमन दलासह एमआयडीसीचे अग्निशमन पथक, फिनोलेक्स अग्निशमन दलाचे मिळून चार बंबांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी नगर परिषद व एमआयडीसी, फिनोलेक्स कंपनीचे अग्निशामक बंब घटनास्थळी कार्यरत होते; परंतु आग आटोक्यात येत नव्हती. त्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यामुळे टँकरधारकांना यावेळी मदतीसाठी पाचारण करण्यात आले. अनेक स्थानिक टँकरमालकांनी पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना केले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांचाही मोलाचा वाटा होता. दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिस दलही घटनास्थळी दाखल झाले होते. प्रांताधिकारी जीवन देसाई संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेसह घटनास्थळी हजर होते. त्याचप्रमाणे शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील आपल्या टीमसह दाखल झाले होते. गर्दीवर नियंत्रण मिळवणे, वाहतूक कोंडी टाळणे व अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग मोकळा करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम पोलिस दलाने केले.
वनिता गिफ्ट शॉपीचे नुकसान
बुधवारी सायंकाळीही आग धुमसत होती. दुपारी ४ वाजल्यानंतरही अग्निशमन दलाने आग पूर्ण विझली की नाही, याची पाहणी केली. बुधवारी सायंकाळी व गुरुवारी सकाळी पोलिस यंत्रणेने घटनास्थळाची पाहणी करीत पंचनामे पूर्ण केले. महावितरणच्या अधिकार्यांनीही पाहणी केली व पंचनामे केले. या घटनेमध्ये भाऊबिजेसाठी सुमारे ४० ते ५० लाखांचा नवीन माल भरण्यात आला होता. त्यापूर्वीचे साहित्य मिळून १ कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. मिनी मॉलच्या बाजूला असणार्या वनिता गिफ्ट शॉपीचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले.
आमदार किरण सामंतांचीही तातडीने घटनास्थळी धाव
या आगीची माहिती मिळताच आमदार किरण सामंत यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांच्या सोबत त्यांचे सर्व सहकारी व पदाधिकारीही उपस्थित होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रशासकीय अधिकारी व यंत्रणेला तातडीच्या व महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी मिनी मॉलचे मयूर खानविलकर व त्यांच्या सहकार्यांची भेट घेत त्यांना धीर दिला.