file photo  
रत्नागिरी

न्यायालयाच्या आवारातच साक्षीदारावर कोयताने हल्ला

रत्नागिरीत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : मारहाणीच्या गुन्ह्यात साक्ष देण्यासाठी रत्नागिरी येथील न्यायालयात आलेल्या साक्षीदारावर त्याच गुन्ह्यातील संशयित आरोपीने कोयत्याने पाठीत वार केला. न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. या हल्ल्यात साक्षीदार जखमी झाले असून, त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वरूप राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पुण्यात वास्तव्यास असणार्‍या राऊत याने पुण्यातील कोयता गँगप्रमाणे रत्नागिरीत धाक दाखवण्याचा प्रयत्न केला की काय? असा प्रश्नही पुढे आला आहे. मारहाणीच्या गुन्ह्यात साक्ष देण्यासाठी रत्नागिरी येथील न्यायालयात आलेल्या साक्षीदारावर त्याच गुन्ह्यातील संशयित आरोपी स्वरूप राऊत याने कोयत्याने पाठीत वार केला. न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. या हल्ल्यात साक्षीदार योगेश रमेश चाळके हे जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. तर योगेश चाळके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वरूप राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत सन 2023 मध्ये मारहाणप्रकरणी स्वरूप राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच गुन्ह्याची सुनावणी येथील न्यायालयात सुरू असून, त्या गुन्ह्यामध्ये योगेश चाळके हे साक्षीदार आहेत. गुरूवारी गुन्ह्याची सुनावणी असल्याने योगेश चाळके (32, टिके चाळकेवाडी) व स्वरूप राऊत (रा. हरचिरी) त्याचे वडील जयसिंग राऊत हे न्यायालयात हजर होते. साक्ष देऊन योगेश चाळके बाहेर पडत असताना स्वरूप राऊत याने पिशवीतून आणलेला कोयता घेऊन पाठीमागून उजव्या खांद्यावर वार केला. त्यामुळे योगेश चाळके खाली कोसळले. त्यानंतर स्वरूपने पुन्हा कोयता उगारली. परंतु तो हल्ला चुकवताना स्वरूपच्या हातातील कोयतीचे टोक योगेश चाळके यांच्या पाठीत घुसले. यामध्ये ते रक्तबंबाळ झाले.

न्यायालयाच्या आवारातच संशयित आरोपीने साक्षीदारावर कोयतीने हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती तेथील पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ स्वरूप याला ताब्यात घेतले. त्यानंतर जखमी झालेल्या योगेश चाळके यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात तातडीने दाखल केले. न्यायालयाच्या आवारातच हा प्रकार घडल्याचे वृत्त शहरात पसरताच एकच खळबळ उडाली. याप्रकरणी योगेश चाळके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वरूप राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्वरूप राऊत याने थेट न्यायालयातच कोयता घेऊन जाण्याची हिंमत कशी दाखवली? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुण्यातील कोयता गँगची अनुभूती

स्वरूप राऊतवर यापूर्वी एक गुन्हा दाखल असून, सध्या तो पुणे येथे वास्तव्याला आहे. गुन्ह्याच्या सुनावणीसाठी तो रत्नागिरीत आला होता. परंतु, पुणे येथे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत का याचा पोलिस शोध घेत आहेत. पुण्यात वास्तव्यास असणार्‍या राऊत याने पुण्यातील कोयता गँगप्रमाणे कोयता आणून रत्नागिरीत धाक दाखविण्याचा प्रयत्न केला की काय, असा प्रश्नही पुढे आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT