राजापूर : पुढारी वृत्तसेवा
राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प.. नाणार रिफायनरी प्रकल्प.. नाटे, आंबोळगड येथील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पावरून गेली दोन दशके सुरू असलेला संघर्ष अद्यापही कायम आहे. असे असतानाच आता पुन्हा एकदा नाणार परिसर संघर्षाच्या पवित्र्यात उभा ठाकला आहे. मात्र यावेळी रिफायनरी नव्हे तर बॉक्साईट उत्खननावरून आणखी एक संघर्ष सुरू होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
सुमारे १५ वर्षांपूर्वी स्थानिक जनतेच्या विरोधामुळे थांबलेल्या नाणार बॉक्साईट प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याचा घाट शासनाने घातला आहे. या बॉक्साइट विरोधात स्थानिक आणि मुंबईतील रहिवासी एकवटले असून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने आयोजित केलेली गुरुवार दिनांक २९ ऑगस्टची जनसुनावणी रद्द करण्यासाठी राजकीय गाठीभेटी सुरू झाल्या आहेत.
बहुचर्चित रिफायनरी प्रकल्प जमीन अधिग्रहण अधिसूचना रद्द केल्यानंतर नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी आंदोलन शांत झाले होते. विस्तीर्ण असलेल्या राजापूर तालुक्यातील नाणार येथील १४४.९५ हेक्टर क्षेत्रावरील ०.९ मे टन प्रतिवर्ष क्षमतेच्या बॉक्साइट उत्खननासाठी मे. सिशीयेदादे दि. फोमेंटो इंडस्ट्रीयल प्रायव्हेट लिमिटेड मडगाव गोवा यांच्या प्रस्तावित नाणार बॉक्सईट ब्लॉकची महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने सुनावणी लावली आहे.
सुमारे १५ वर्षांपूर्वी नाणार बॉक्सईट ब्लॉकची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी स्थानिक जनतेने पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे कारण देत विरोधी सूर आळविण्यास सुरुवात केल्याने नाणार बॉक्सईट ब्लॉकची चर्चा मागे पडली होती. त्यावेळी नाणार, कुंभवडे परिसरातून जोरदार संघर्ष करून बॉक्साइट उत्खनन रद्द करायला भाग पाडले होते. त्यानंतर बहुचर्चित रिफायनरी प्रकल्प आणण्याचा घाट घातला गेला.
रिफायनरी विरोधी प्रखर आंदोलनामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रिफायनरी प्रकल्प अधिसूचना रद्द करावी लागली होती. त्यानंतर नाणार शांत झाले असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा नाणारमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागले आहेत.
मात्र यावेळी रिफायनरीची जागा बॉक्साईट उत्खननाने घेतली आहे. त्याची जन सुनावणी नोटीसची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि संतप्त झालेल्या समस्त ग्रामस्थांनी बॉक्साईट उत्खननाला जोरदार विरोध सुरू केला आहे.
गोवा राज्यातील सोशीयेदादे दि. फामेंटो इंडस्ट्रीयल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा नाणार बॉक्सईटचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे सादर केला आहे. या प्रस्तावावर पर्यावरण विषयक सूचना, विचार, टिका, टिप्पणी तसेच आक्षेप नोंदवण्यासाठी सौ. विजया नारायण कुळकर्णी सभागृह नाणार येथे गुरुवार दि २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जनसुनावणी लावली आहे.
हा प्रकल्प नाणार गावच्या हद्दीत होणार असला तरी त्याचे दुष्परिणाम परिसरातील गावांना भोगावे लागणार आहेत. बॉक्सईटला विरोध करण्यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामस्थांनी विरोध करण्यासाठी ग्रामस्थांची जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यात आणखी एका प्रकल्पावरून संघर्षाचा भडका उडण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. बॉक्साइट उत्खननावरून सुरू झालेला हा संघर्ष किती पसरतो. जनतेच्या उद्रेकापुढे शासन लावलेली जन सुनावणी रद्द करते का? रेटून नेते त्याकडे आता समस्त तालुकावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.