रत्नागिरी : येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रत्नागिरी जिल्हा सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अन्य जिल्ह्यांसाठी वेळ द्यावा. सिंधुदुर्गात आमदार नीलेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि येथे आम्ही सर्व आमदार असूच. आम्ही या निवडणुकांमध्ये तुमच्यापुढे ढाल बनून या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था शिवसेनेच्या ताब्यात आणणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी आभार सभेत सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी निधी प्राप्त झाला. मागील निवडणुकीवेळी शिंदे यांच्याबाबतीत विरोधकांकडून वेगवेगळे अपप्रचार करण्याचा प्रयत्न झाला. पैजादेखील लागल्या होत्या. पण आमदार म्हणून आपण स्वत:, आमदार किरण सामंत, मंत्री योगेश कदम, आमदार नीलेश राणे यांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारून, विधानसभेत जाण्याचा त्यांच्यावरील विश्वास पक्का ठेवला होता, असेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करून कौतुक केले. दिल्लीच्या तख्तावर सत्कार होणारे शिंदे आहेत. त्यामुळे त्यांच्या सत्काराने पोटशूळ उठणार्यांना रत्नागिरीत ठाकरे सेनेतून शिवसेनेत झालेला मेगा पक्षप्रवेश हे उत्तर असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. पक्षप्रवेश हा दुसरा टप्पा आहे, पहिला टप्पा माजी आमदार राजन साळवी यांच्या प्रवेशाने झाला. अजूनही एक शिल्लक पक्षप्रवेश तो देखील पुढील महिनाभरात होईल आणि या धनुष्यबाणाचा भगवा येथे फडकेल, असा विश्वासही सामंत यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
गेल्या अडीच वर्षांत रत्नागिरीत जो विकास झालेला बघितला तेवढा विकास यापूर्वी कधीही बघितला नव्हता. यापूर्वीच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी इतका त्यासाठी भरीव निधी दिला नव्हता तेवढा हजारो कोटींचा निधी शिंदे यांनी दिल्याचे कौतुक मंत्री सामंत यांनी केले. म्हणून पक्षातील सर्वांची जबाबदारी राहणार आहे. महिला भगिनी देखील शिंदेंच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. हा असा शिंदे यांचा सन्मानाचा झेंडा कायम रत्नागिरीत राहील, असे सामंत म्हणाले.
ज्या नेत्याने रत्नागिरीला विकासाची दिशा दिली, पाहिजे ते विकासातून दिले, त्यामागे ठामपणे उभी राहण्याची भूमिका रत्नागिरीकरांनी घेतल्याबद्दल सामंत यांनी यावेळी आपल्या मनोगतात समाधान व्यक्त केले. त्यामुळे नव्याने शिवसेनेत पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकार्यांना शिंदे यांच्याकडून आवश्यक ते देण्यासाठी मागे राहणार नाही याची ग्वाही दिली. कोणताही अन्याय होणार नसल्याचे सांगितले.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा, नगर पंचायती सर्व जिंकायच्या असतील तर आज एकसंध व्यासपीठ भविष्यातही कायम राहिलं तर शिवसेनेला कोणताही माय का लाल भेदू शकणार नसल्याचे मंत्री सामंत यांनी ठणकावून सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी रत्नागिरी जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यामध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी वेळ द्यावा. येथे माझ्यासह आमदार किरण सामंत, योगेश कदम आहेत. सिंधुदुर्गमध्ये आमदार नीलेश राणे, दीपक केसरकर आहेत. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था शिवसेनेच्या ताब्यात आणणार असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.