रत्नागिरी : गणेशोत्सवानिमित्त खेडोपाड्यात उत्साहाचे वातावरण आहे. अशातच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीइतकीच चुरस या निवडणुकांत असल्याने गावाकडे आलेल्या कोकणवासीयांच्या मतपरिवर्तनासाठी स्थानिक नेतेमंडळींचे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यातील 9 पंचायत समित्या, 8 नगरपालिका व नगरपरिषदेवर तसेच जिल्हापरिषदेवर प्रशासकीय राजवट आहे. आठ महिन्यापूर्वी जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींपैकी 250 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. अशातच लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या माध्यमातून किमान तीन हजार लोकप्रतिनिधी निवडले जाणार आहेत. साधारण 8 ते 10 हजारांहून अधिक स्थानिक नेते निवडणुका लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते निवडणुकीच्या कामाला लागल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच गणेशोत्सवानिमित्त बाहेरगावी राहणारी मंडळी गावाकडे आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीगाठीतून नेतेमंडळी आगामी निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी करीत आहे.
गणशोत्सवासाठी मुंबईतून येण्यासाठी वेळेत बस नसल्याने येथील राजकीय नेतेमंडळींनी मोफत बससेवा सुरू केली होती. या सेवेचा लाभ जिल्ह्यातील संगमेश्वर, चिपळूण, दापोली, खेड, गुहागर, लांजा, रत्नागिरी, राजापूर या तालुक्यातील लोकांनी घेतला. अचानक गावाकडे येण्याचा निर्णय घेतला त्याना ही सेवा उपयोगी पडली. मोफत बससेवा देण्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाची नेतेमंडळी आघाडीवर आहे.
येत्या चार-पाच महिन्यात जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. यापार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सध्याच्या सण-उत्सवांनंतर लगेचच निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे मतदारांशी संपर्क ठेण्याची ही नामी संधी राजकीय नेते मंडळींकडे आली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक गणपती उत्सवाची मंडळ कमी असली तरी घरोघरी गणपती येत असल्याने नेतेमंडळी प्रत्येक घरात भेटी देऊन मोदक, आरती संग्रह आपल्या नावाचे देत आहेत. यातून त्यांची प्रसिद्धी होत आहे.