एसटीत वाचनालयाची नुसती घोषणा File Photo
रत्नागिरी

Ratnagiri News : एसटीत वाचनालयाची नुसती घोषणा

अद्याप रत्नागिरी, पाली, गुहागर बसस्थानकावर फिरते वाचनालय नाहीच

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील 74 बसस्थानकात वाचनालय सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. नोव्हेंबर महिना उजाडला अद्याप रत्नागिरी, पाली, गुहागर या तीन बसस्थानकावर फिरते वाचनालय सुरू झालेले नाही. जिल्ह्यासह राज्यातील कोणत्याच बसस्थानकावर अद्याप तरी वाचनालय सुरू झाले नसल्याचे सांगण्यात आले.

बसस्थानकात एसटी वेळेवर न आल्यास प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागते. त्यावर पर्याय म्हणून बसस्थानकात मोफत वाचनालय सुरू करण्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. स्थानकातील वाचनालयात मराठी वृत्तपत्रांसह कथासंग्रह, स्पर्धा परीक्षेसाठीची पुस्तके उपलब्ध असणार असून पुस्तके नोंद करून घरी घेऊन जाता येणार आहे. असेही सांगण्यात आले होते. मात्र ही योजना जाहीर करून दीड महिना होत आला अद्याप तरी रत्नागिरी बसस्थानकासह पाली, गुहागर बसस्थानकावर फिरते वाचनालय सुरू झाले नाही. नुसती घोषणा करण्यात आल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

प्रसिद्धीसाठी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातात मात्र या घोषणांची पूर्तता करताना आवश्यक निधी तसेच योग्य ती कार्यवाही करण्याबाबत कोणतीच योजना आखली जात नाही, अशी बोचरी टीकाही नागरिकांमधून करण्यात येत आहे.

या स्थानकांवर नाहीत वाचनालये

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, नाशिक, जळगाव, धुळे, पुणे, बीड, छत्रपती संभाजी नगर, लातूरसह अन्य ठिकाणी वाचनालय सुरू होणार आहे. मात्र अद्याप कोणत्याच बसस्थानकावर फिरते वाचनालय सुरू झालेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील 74 बसस्थानकावर मोफत फिरते वाचनालयाची घोषणा करण्यात आली होती. कल्पना चांगली आहे. मात्र प्रत्यक्षात हालचाली करून वाचनालय सुरू होणे अपेक्षित होते. जेणेकरून वाचन संस्कृती वाढेल, प्रवाशांचा वेळ ही सत्कार्णी लागेल.
पंकज पवार, प्रवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT