अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेला बिबट्या.  
रत्नागिरी

Leopard Injured Accident : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर बिबट्याला अज्ञात वाहनाची धडक, बिबट्या गंभीर जखमी!

जखमी बिबट्या नागरी वस्तीजवळील बागेत शिरल्याने परिसरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील हातखंबा नजीकच्या 'चांद-सूर्या पॉईंट' परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्या गंभीर जखमी झाला असून, धडकेनंतर त्याने महामार्गालगत असलेल्या मलुष्टे यांच्या बागेत धूम ठोकली आहे. जखमी बिबट्या नागरी वस्तीजवळील बागेत शिरल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, त्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

​शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास चांद-सूर्या पॉईंटजवळ हा बिबट्या महामार्ग ओलांडत होता. त्याच वेळी कोल्हापूर किंवा रत्नागिरीच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. धडक बसल्यानंतर बिबट्या विव्हळतच लगतच्या मलुष्टे यांच्या बागेतील दाट झाडीत निघून गेला. महामार्गावर अपघात झाल्याचे आणि बिबट्या बागेत शिरल्याचे समजताच स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. बघ्यांची वाढती गर्दी आणि अंधार यामुळे बिबट्या बिथरण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिकांनी तातडीने वनविभागाला याची माहिती दिली.

​घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाचे पथक पिंजरा आणि आवश्यक बचाव साहित्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनकर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम परिसरातील बघ्यांची गर्दी बाजूला करून बागेच्या सभोवताली शोधमोहीम हाती घेतली. वाहनाच्या धडकेमुळे बिबट्या जखमी अवस्थेत असल्याने तो फार लांब जाऊ शकत नाही आणि बागेतीलच झाडीझुडपांत लपून बसला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

​अंधार आणि दाट झाडी यामुळे बचाव कार्यात अडथळे येत असले तरी, बिबट्याला कोणतीही इजा न होता किंवा त्याचा कोणालाही उपद्रव न होता त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून पिंजरा लावून विशेष मोहीम राबवली जात आहे. या घटनेमुळे हातखंबा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रात्री उशिरापर्यंत वनविभागाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरूच होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT