तुरळ येथे बिबट्याचा सर्पदंशामुळे मृत्यू! 
रत्नागिरी

Ratnagiri Leopard Death : तुरळ येथे बिबट्याचा सर्पदंशामुळे मृत्यू!

शवविच्छेदन अहवालातील माहिती

पुढारी वृत्तसेवा

देवरुख : नजरेत भक्ष्य टिपण्याची ताकद, पावलांत विजेचा वेग आणि दबा धरून शिकार करण्याची अफलातून कला व ज्या बिबट्याच्या चाहुलीने जंगलातील इतर प्राण्यांची पळापळ उडते, त्याच बिबट्याच्या आयुष्याचा शेवट एका विषारी सापाच्या दंशाने व्हावा, हे किती अनपेक्षित आहे? दुसऱ्याची शिकार करण्यासाठी जंगलात भटकणारी मादी बिबट्याच अखेर सर्पदंशाची शिकार ठरली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मृतावस्थेत आढळलेल्या या बिबट्याच्या मृत्यूमागील सत्य शवविच्छेदन अहवालातून समोर आल्यानंतर परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे .

रविवारी मध्यरात्री गोळवली ते तुरळदरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी एक मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आली. रात्रीच्या अंधारात महामार्गावर पडलेल्या या वन्यजीवाला पाहून प्रवाशाच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण झाले. क्षणाचाही विलंब न करता त्याने वन विभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र जंगलातील चपळ शिकारीचा जीवनप्रवास तोपर्यंत संपला होता.

मृत बिबट्याला ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी साडवली येथे नेण्यात आले. महामार्गाच्या मध्यभागी बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने अज्ञात वाहनाच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त होत होती. मात्र प्रत्यक्ष शवविच्छेदनानंतर या घटनेचे चित्रच बदलले. साखरपा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत बिबट्याच्या शरिरावर वाहनाच्या धडकेच्या ठळक खुणा आढळल्या नाहीत. शरिरातील अवयवही सुस्थितीत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. अखेर शवविच्छेदन अहवालात सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

बिबट्याची शिकार करण्याची क्षमता, चपळाई व नैसर्गिक ताकद यामुळे त्याला जंगलातील प्रभावी शिकारी मानले जाते. मात्र निसर्गाच्या दरबारात कोणताही जीव कायमचा बलाढ्य नसतो, हे या घटनेने दाखवून दिले आहे. त्या‍ला विषारी सर्पाच्या दंशाने जीव गमवावा लागला ही बाब जितकी आश्चर्यकारक आहे, तितकीच हळहळ व्यक्त करायला लावणारी आहे. जंगलात प्रत्येक जीवाचा संघर्ष सुरू असतो; मात्र त्या संघर्षाचा शेवट कधी, कुठे आणि कसा होईल, हे सांगता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT