रत्नागिरी : तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्यातील धरणांमधील पाणी गळतीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील ७१ पैकी १० धरणांना गळती लागली असून यामुळे हजारो लिटर मौल्यवान पाणी वाया जात आहे. बाष्पीभवनाचे वाढते प्रमाण आणि यावर्षी झालेला अल्प पाऊस यामुळे आधीच जलसाठे खालावले आहेत. त्यातच गळतीमुळे संकटात आणखी भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने १० धरणांच्या दुरुस्तीचा तब्बल ५०० कोटींचा सर्वसमावेशक प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. यावर शासन काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात एकूण ७१ धरण प्रकल्प असून यात ३ मध्यम प्रकल्पांचाही समावेश आहे. या सर्व प्रकल्पांमधील पाणीसाठ्याचे जतन करणे आणि ते वाचवणे, यावर पाटबंधारे विभागाचा सध्या मुख्य भर आहे. जिल्ह्यामध्ये चालू वर्षाच्या पावसाळ्यानंतर धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करताना पाटबंधारे विभागाने 'पिण्याचे पाणी' यालाच प्रथम प्राधान्य दिले आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण ७२ धरणांमध्ये सुमारे ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल, असा दावा आहे. बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढत आहे. अशा दुष्काळी व कठीण परिस्थितीमध्ये धरणातील गळती ही अत्यंत गंभीर बाब समोर आहे. जिल्ह्यातील १० धरणांना गळती लागल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. या धरणांच्या दुरुस्तीसाठी पाऊल उचलण्यात आले आहे. ही गळती किती गंभीर किंवा किरकोळ स्वरूपाची आहे, याबाबत नाशिक विभागाकडून सविस्तर पाहणी करून घेण्यात आली आहे.
या पाहणीच्या आधारावर धरणांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव व अंदाजपत्रक तयार करून ते मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहेत. हे प्रस्ताव आता राज्य तांत्रिक सल्लागार समितीपुढे सादर केले जातील. त्यानंतर ते शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी जातील. शासनाची शिखर संस्था या सर्व तांत्रिक बाबींची कसून तपासणी करेल आणि त्रुटी असल्यास त्या दूर केल्यावर अंतिम मंजुरी मिळून निधी उपलब्ध होईल. एका धरणाच्या दुरुस्तीसाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यानुसार १० धरणांसाठी एकूण ५०० कोटी रुपयांचा खर्च या प्रस्तावात धरण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने १० धरणांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव दिला आहे. प्रत्येक धरणाच्या दुरूस्तीला सुमारे ५० कोटीचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार ५०० कोटींचा सर्वसमावेशक प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला असल्याची माहिती अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी दिली.