Devdhamapur Woman Passes HSC at 52
साडवली: क्षेत्र कोणतेही असो त्यात जिद्दीने व चिकाटीने प्रयत्न केले, तर यश हे नक्कीच मिळते. संगमेश्वर तालुक्यातील देवधामापूर येथील लता राजाराम लिंगायत यांनी वयाच्या ५२ व्या वर्षी १२ वीची परीक्षा दिली.आज (दि.५) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात त्यांनी ६१ टक्के गुण मिळवले आहेत. वयाच्या पन्नाशीनंतर मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.
लता लिंगायत या धामापूर तर्फे देवरुख येथील अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. आपल्या नोकरी व कौटुंबिक जबाबदारीतून वेळ काढत त्यांनी मोठ्या जिद्दीने व चिकाटीने १२ वीची परीक्षा दिली. त्यांचे सासरचे नाव लता विजय देवधरकर असे आहे. दहावीनंतर पुढील शिक्षणाची ओढ होती. मात्र, नोकरी आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना शिक्षणासाठी वेळ देणे अवघड होते. त्यात वयही वाढत चालले होते. मात्र, शिक्षणाची ओढ काही कमी होत नव्हती.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात आपण १२ वीची परीक्षा द्यायची, असा मनाशी ठाम निर्णय घेत परीक्षा दिली. नोकरी आणि कौटुंबिक कामातून वेळ काढून अभ्यास केला. त्यांना यश मिळाले असून ६१ टक्के गुण मिळाले आहेत.
दहावीनंतर ३०-३५ वर्षानंतर पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येऊन यश मिळविणे सोपे नसते. त्यात उतरते वय आणि जबाबदर्या या गोष्टी आल्या. या सर्वांचा विचार करून त्यांनी वयाच्या पन्नाशीत बारावीमध्ये मिळविलेले यश हे कौतुकास्पद आहे.