लांजा : लांजा नगर पंचायतीने प्रारूप विकास आराखडा राजपत्रामध्ये प्रसिद्ध केला असून त्या अनुषंगाने लांजा शहरातील नागरिकांना डीपीआर समजावून सांगणे तसेच येथील लोकांची शंका, अडचणींचे निरसन करण्यासाठी शनिवारी सभेचे आयोजन केले असताना आता विकास आराखड्यावरून वादाची ठिणगी पडली आहे. तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्याला कुवे ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शवला असून विकास आराखडा त्वरित रद्द करा, अशी मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी लांजा नगर पंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
एखादी बैठक, अथवा नागरिकांना कोणतीच माहिती न देता मनमानी पद्धतीने लांजा नगर पंचायतीने विकास आराखडा तयार केला असल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. लांजा नगरपंचायतीने तयार केलेला विकास आरखडाबाबत शंका, अडचणीचे निरसन करण्यासाठी नगर पंचायतीने शनिवारी बैठक आयोजित केली आहे. मात्र नगर पंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्याला नागरिकांचा आता प्रत्यक्ष विरोध पुढे आला आहे. लांजा नागरपंचायत हद्दीतील कुवे प्रभाग क्रमांक 16 व 17 वार्डच्या नागरिकांनी विरोध करत मुख्याधिकारी यांना शुक्रवारी निवेदन दिले. त्यामुळेच प्रारूप विकास आराखड्यावरून नागरिक व नगर पंचायत प्रशासन यांच्यात खडाजंगी सुरू झाली आहे.
ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व मतदार, करदाते यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यांच्या बहुतांश जमिनी या शेत जमिनीच आहेत. त्यामधून जाणारे रस्ते, पायवाटा या शेतकर्यांच्या जमिनीतून गेलेल्या आहेत. त्या रस्त्यांना लागणार्या जमिनी विनामोबदला देण्यात आलेल्या आहेत. 90 टक्के घरे ही सन 1905 पूर्वीची आहेत. शाळा, विहिरी, देवस्थाने आहेत. हे सर्व त्यांच्या सहमतीने व गरजेनुसार अस्तित्वात आलेली आहेत. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाने लोकहित बाजूला ठेवून सदर आराखडा नगर पंचायत क्षेत्रातील लोकांवर लादण्याचा घाट घातला आहे.
राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात आल्यानंतर महामार्गा लगतच्या जागांचे मूल्य वाढले आहे. या जमिनीवरील व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यावर कृषीक आरक्षण लादले आहे. त्यामुळे नागरिकांच्या शेतजमिनींचे नुकसान होणार आहे. रस्त्यालगतच्या 1905 पूर्वीची महसूल माफीची घरे बाधित होणार आहेत. यातील कुवे नगरपंचायत क्षेत्रामध्ये एकूण आरक्षणाच्या 70 टक्के भाग कृषीक आरक्षण व नॉन डेव्हलपमेंट झोनमध्ये आरक्षित दाखवण्यात आलेला आहे. वास्तविक नगर पंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी प्रत्येक नागरिकांशी संपर्क करून लोकांचे नुकसान न होता सदर आराखडा कसा राबवता येईल याची काळजी घ्यायला हवी होती. मात्र, नगर पंचायतीने घाईगडबडीने सदर आराखडा लादण्याचा घाट घातला आहे. याला आमचा कडाडून विरोध आहे. त्यामुळे तयार करण्यात आलेला प्रारूप विकास आराखडा त्वरित रद्द करावा, अशी मागणी कुवे ग्रामस्थांनी लांजा नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रारूप विकास आराखड्याबाबत कुवे गावचे ग्रामस्थ लांजा-राजापूर आमदार किरण सामंत यांची भेट घेणार असून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे ग्रामस्थांनी संगीतले. लांजा नगर पंचायतीला निवेदन देताना कुवे गावचे ग्रामस्थ किसन नेमण, अशोक गुरव, शामसुंदर खानविलकर, रजनीकांत सुर्वे, मनोज महिंद्रे, कृष्णा वाघरे, कृष्ण निवळे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.