लांजा : लांजा शहरातील उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम करणाऱ्या कामगाराला कारने जोरदार धडक दिली. यात कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. गोपाल मुरमू (वय ४५ वर्षे, राहणार द्वारहट्टा, जिल्हा होगली, राज्य पश्चिम बंगाल) असे मृताचे नाव आहे.
गणेशोत्सवापूर्वीच शहरातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला आहे. सध्या उड्डाणपुलावरील किरकोळ कामे सुरू आहेत. मंगळवारी गोपाल हा उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम करत होता. याचदरम्यान गोव्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कार (केए ०३ एसी ३६००) ने त्याला जोरदार धडक देत फरपटत नेले. ही कार मौला कासम शेख (वय ३८ वर्षे, राहणार मुरुगवाडा रत्नागिरी, मूळ राहणार आबावाडी अक्कलकोट, जिल्हा सोलापूर) हा चालवत होता. याबाबतची तक्रार राजशेखरन मुरुगन (वय ३४ वर्षे, प्रोजेक्ट मॅनेजर, सीमा इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनी, रा. तामिळनाडू) यांनी लांजा पोलिसांना दिली.
या प्रकरणी पोलिसांनी कारचालक मौला कासम शेख याच्या विरोधात मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत.