रत्नागिरी

रत्नागिरी : अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; वाहतूक बंद

दिनेश चोरगे

राजापूर; पुढारी वृत्तसेवा : राजापुरात दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अणुस्कुरा घाटात गुरुवारी रात्री दरड कोसळली. घाटातील रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. परिणामी दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

 कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा सर्वात जवळचा घाट म्हणून अणुस्कुरा घाटाची ओळख आहे. शिवाय खोल दर्‍या आणि उंच सह्याद्रीच्या कडांनी या घाटातील वाहतूक कायमच जिकिरीची असते. या दमदार पावसात गुरुवारी रात्री 8.30 च्या सुमारास दरड कोसळली. यामध्ये मोठे दगड व माती असून यामुळे घाटमार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. रात्रीच्या सुमारास पाऊस सुरू असतानाच कोसळलेल्या दरडीमुळे जीवितहानी झाली नसून वाहतूक मात्र थांबली आहे. या मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रशासनाला याची माहिती समजताच दरड हटविण्यासाठी यंत्रणा क्रियाशील झाली होती. पण रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू असल्याने वाहनधारक, प्रवाशांची मोठी कुचंबणा झाली होती.

SCROLL FOR NEXT