सह्याद्रीच्या कुशीतून कोकण-पश्चिम महाराष्ट्र जोडणार 
रत्नागिरी

Konkan tunnel project| सह्याद्रीच्या कुशीतून कोकण-पश्चिम महाराष्ट्र जोडणार; तीन भुयारी मार्ग!

खेड-सातारा मार्ग रघुवीर घाट आणि कास पठाराखालून जाणार; कोकणातील दळणवळणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

खेड : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर कमी करून दळणवळण अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून तीन महत्त्वाकांक्षी भुयारी मार्ग विकसित करण्याची संकल्पना पुढे आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १३ नोव्हेंबर रोजी महाबळेश्वर येथे या प्रस्तावित मार्गांबाबत माहिती दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये खेड-सातारा हा मार्ग रघुवीर घाट आणि कास पठाराखालून नेण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यामुळे खेडसह दापोली आणि संपूर्ण कोकणाच्या दळणवळणाच्या दृष्टीने या प्रकल्पाकडे आशेने पाहिले जात आहे.

प्रस्तावित तीन मार्गांमध्ये पोलादपूर-जांभळी (वाई), खेड-सातारा आणि मेढा-तापोळा या मार्गांचा समावेश आहे. पोलादपूर येथून वाई तालुक्यातील जांभळीपर्यंत भुयारी मार्ग विकसित करण्याची संकल्पना असून महाबळेश्वरला जोडण्यासाठी स्वतंत्र जोडरस्त्याचाही विचार आहे. दुसऱ्या महत्त्वाच्या खेड-सातारा मार्गासाठी रघुवीर घाट आणि कास पठाराखालून भुयारी मार्ग प्रस्तावित आहे, तर तिसऱ्या मार्गात पाचवड-मेढा नवीन महामार्गाशी जोडून मेढा ते तापोळादरम्यान भुयारी मार्ग विकसित करण्याची संकल्पना आहे.

सध्या खेडहून साताऱ्याकडे जाण्यासाठी घाटमार्गांचा आधार घ्यावा लागतो. रघुवीर घाट परिसरातील अवघड वळणे, डोंगराळ भूप्रदेश आणि पावसाळ्यातील वाहतुकीच्या अडचणी लक्षात घेता भुयारी मार्गाची संकल्पना महत्त्वपूर्ण ठरू शकते. हा मार्ग प्रत्यक्षात साकारल्यास खेड आणि सातारा यांच्यातील प्रवास अधिक सुलभ होण्यासह वेळेची बचत, सुरक्षित वाहतूक आणि कोकण-पश्चिम महाराष्ट्रातील व्यापाराला चालना मिळण्याची शक्यता आहे. या मार्गामुळे खेड, दापोली व मंडणगड परिसरातील नागरिकांना पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होऊ शकतो. कृषी मालाची वाहतूक, पर्यटन, औद्योगिक व्यवहार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, या तीनही भुयारी मार्गांच्या बाबतीत सध्या संकल्पनात्मक पातळीवरील माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT