konkan monsoon updates 
रत्नागिरी

Konkan Monsoon : गतवर्षी जूनमध्ये मान्‍सून धो-धो; यंदा कोकणात संथ प्रारंभ

यंदा अडीचशे मि.मी. कमी पाऊस, खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट; जिल्‍ह्यात धरणे, नद्यांची पाणी पातळी खालावली

पुढारी वृत्तसेवा

जाकीरहुसेन पिरजादे

रत्‍नागिरी : गतवर्षी कोकणात मान्‍सूनचा जोरदार वर्षाव झाला होता. १ ते १५ जूनदरम्‍यान पावसाने दमदार बॅटिंग करीत ३०१.५५ मि.मी. पाऊस पडला होता. मात्र, यंदाच्‍या वर्षी ६६.५५ मिमी पाऊस झाला आहे. म्‍हणजेच अडीचशेहून अधिक मि.मी. पाऊस कमी पडला आहे. मान्‍सूनचा पाऊस म्‍हणावा तसा झालेला नाही. यामुळे रत्‍नागिरीकरांच्‍या पदरी जूनमध्ये निराशा पडण्याची शक्‍यता नाही. पावसाने संथ सुरुवात केल्‍यामुळे खरीप हंगामावरही दुष्काळाचे सावट पडण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे जिल्‍ह्यातील धरणे, नद्यांच्‍या पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे.

मागील वर्षी मे महिन्‍यात पावसाने दमदार बॅटिंग केली होती. अक्षरश: रत्‍नागिरी जिल्‍ह्याला झोडपून काढले होते. जून महिन्‍यात तब्‍बल ८१७ मि.मी. इतका पाऊस झाला होता. त्‍यामुळे रत्‍नागिरीकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. कोकणाच्‍या इतिहासात यापूर्वी मे महिन्‍यात इतका मोठा कधीच पाऊस झाला नव्‍हता. त्‍यामुळे जिल्‍ह्यातील धरणे, नद्या दुथडी भरून वाहत होत्‍या. पाणीपातळी झपाट्याने वाढली होती. यंदा मात्र परिस्‍थिती पूर्ण उलटी आहे. यावर्षी मेमध्ये वाढते तापमान आणि उकाड्याने रत्‍नागिरीकर हैराण झाले होते. घामाने अक्षरश: लाहीलाही झाली होती. दोन ते तीनवेळा वळिवाचा व अवकाळी पाऊस झाला. मात्र त्‍यानंतर पुन्‍हा उकाडा जाणवत होता. त्‍यानंतर मान्‍सूनचा पाऊस सलग दोन दिवस बरसला. त्‍यानंतर पावसाने ब्रेक घेतला असून ऐन पावसाळ्यात उन्‍हाळ्या सारखे वातावरण आहे. खरीप हंगामाची तयारी शेतकरी करीत असून काहीजण रोटर, नांगरणी मारून पेरणी करीत आहेत. जर पाऊस न झाल्‍यास दुबार पेरणी करण्याचे संकट ओढण्याची शक्‍यता आहे.

जिल्‍ह्यात जून ते सप्‍टेंबर या चार महिन्‍यांच्‍या कालावधीत साधारणपणे ३ हजारहून अधिक मिमी पर्जन्‍यमान होते. जून महिन्‍यात पहिल्‍या किंवा दुसऱ्या आठवड्यात पावसास सुरुवात होते. जून महिन्‍यात ८१८ मिमी पाऊस पडतो, जुलै महिन्‍यात ११२८६.४० मिमी पाऊस पडतो. ऑगस्‍ट महिन्‍यात पावसाचे प्रमाण कमी होत आणि या महिन्‍यात ८२९ मिमी इताक पाऊस होतो, सप्‍टेंबरच्‍या शेवटी पावसाची परती सुरू होते.

कोकण आणि मुसळधार पाऊस हे समीकरण पिढ्यानपिढ्या चालत आले आहे. दरवर्षी सरासरी ३ हजार ३६४ मिमी पाऊस पडणाऱ्या या जिल्‍ह्यात गेल्‍या तीन ते चार वर्षांपासून प्रमाण कमी झाले आहे. सातत्‍याने समुद्रात निर्माण झालेल्‍या वादळामुळे मे महिन्‍यात अवकाळी वादळी पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, यंदा महासागरातील पाण्याच्‍या पृष्ठभागाचे तापमान वाढल्‍यामुळे मान्‍सूनचे वारे कमकुवत झाले. याचा थेट फटका कोकण किनारपट्टीला बसला व रत्‍नागिरीत मान्‍सून संथगतीने दाखल झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT