चिपळूण : श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठाच्या फलकाचे अनावरण करताना ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, सोबत डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, कुलगुरु प्रा. डॉ. भूषण पटवर्धन, कुलगुरु डॉ. श्रीपाद बाणावली, डॉ. नितीन करमळकर, माजी मंत्री शशिकांत सुतार  
रत्नागिरी

Anil Kakodkar| कोकणाला पहिले अभिमत विद्यापीठ : डॉ. अनिल काकोडकर

डेरवण येथे कोकणातील पहिले श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठ सुरू; शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासावर भर

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : कोकणातील पहिले अभिमत श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठ डेरवण येथे मंगळवारी औपचारिकपणे सुरू झाले. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्याहस्ते विद्यापीठाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी हे विद्यापीठ भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्याबरोबरच भविष्यात जागतिक स्तरावर अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला.

समारंभाला डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. भूषण पटवर्धन, महाराष्ट्र राज्य एनईपी-२०२० सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन करमळकर, माजी कृषीमंत्री शशिकांत सुतार, विद्यापीठाचे कुलपती विकास वालावलकर, कुलगुरू डॉ. श्रीपाद बाणावली, रजिस्ट्रार डॉ. सुवर्णा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. काकोडकर म्हणाले, भारतातील शिक्षण व्यवस्थेत ज्ञानाबरोबर कौशल्य, संशोधन आणि विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणाऱ्या शिक्षणाची गरज आहे. केवळ पदवी देणाऱ्या संस्था नव्हे, तर समाजोपयोगी संशोधन करणारी विद्यापीठे निर्माण झाली पाहिजेत. डेरवणमधील हे विद्यापीठ त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल. कुलपती विकास वालावलकर यांनी संस्थेच्या सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेत विद्यापीठ स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली. कोकणातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे हे विद्यापीठाचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. पी. डी. पाटील यांनी डेरवण कॅम्पसचे कौतुक करत तो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संकुलाची अनुभूती देणारा असल्याचे सांगितले.प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यांनी भविष्यात डेक्कन कॉलेजमार्फत संयुक्त अभ्यासक्रम राबविण्यास सहकार्य करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजिस्ट्रार डॉ. सुवर्णा पाटील यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT