रत्नागिरी : दसरा-दिवाळी सणाचे औचित्य साधून मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी 20 विशेष साप्ताहिक सेवा जाहीर केल्या आहेत. या विशेष गाड्यांमुळे गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीदरम्यान कोकण आणि केरळला जाणार्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या बाबत रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 01463 ही लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम उत्तर अशी धावणार आहे. दर गुरुवारी सायंकाळी 4 वाजता लो. टिळक टर्मिनस येथून सुटून दुसर्या दिवशी रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल. या गाडीच्या 25 सप्टेंबर 2025 ते 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत. एकूण 10 सेवा होणार आहेत. याचबरोबर उलट दिशेच्या फेरीत गाडी क्रमांक 01464 तिरुवनंतपुरम उत्तर ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी दर शनिवारी सायंकाळी 4 वा. 20 मिनिटांनी वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथून सुटून दुसर्या दिवशी रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ही गाडी 27 सप्टेंबर 2025 ते 29 नोव्हेंबर 2025 पर्यंत. एकूण 10 फेर्या करणार आहे.