रत्नागिरी

कोकणातील गणरायांकडे ‘राजकारण्यांचे साकडे’!

दिनेश चोरगे

गणेशोत्सव हा सर्वत्र साजरा होत असला, तरी कोकणच्या गणेशोत्सवाचे वेगळेपण सर्वांनाच भावते. कोकणी माणूस हा उत्सव एक 'महाउत्सव' म्हणून गुण्यागोविंदाने साजरा करत असतो. 2024 हे निवडणुकांचे वर्ष असल्याने राजकीय नेत्यांनी यावर्षी कोकणात धाव घेत गणरायाकडे निवडणुकीतील यशाचे साकडे घातले असल्याची जोरदार चर्चा आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावर्षी प्रथमच सिंधुदुर्गात दाखल होत कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्या श्रीगणेशाचे दर्शन घेत शिवसेनेला बळ मिळो, अशी प्रार्थना केल्याचे सांगितले जाते.

नागपंचमी, नारळीपौेर्णिमा आणि गोकुळाष्टमी झाली की गणेश चतुर्थीचे कोकणी माणसाला वेध लागतात. प्रतिवर्षी मुंबईकर चाकरमानीसुद्धा कोकणात घरी येण्यासाठी व्याकूळ होतो. चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी एसटी, रेल्वेसेवाही सज्ज असते. तशी यावर्षीसुद्धा एसटी व रेल्वेसेवा सज्ज होती. कोकणच्या महाउत्सवात यावर्षी ठाकरे घराण्याचे आदित्य ठाकरे यांच्या रूपाने प्रथमच एन्ट्री झाली. ठाकरेंच्या एन्ट्रीने त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ठाकरे यांनी शिवसेना खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, काँग्रेसचे नेते विकास सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले. ठाकरे यांच्या या गणेश दर्शनाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी चर्चा होऊन एक वेगळा माहोल तयार झाला. प्रतिवर्षीप्रमाणे कोकणात मुंबईकर चाकरमान्यांची संख्या मोठी असल्यामुळे ठाकरेंच्या एन्ट्रीची अधिकच चर्चा रंगली.

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण हेसद्धा दरवर्षी आपल्या मालवण तालुक्यातील पेंडूर येथील मामाच्या घरी गणेशोत्सवाला येतात. यावर्षीही त्यांनी आवर्जून भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही प्रतिवर्षीप्रमाणे आपल्या वेेंगुर्ले येथील मूळ गावी गणेशोत्सवाला हजेरी लावत गणरायची पूजा केली. तसेच आपल्या काही समर्थक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही सावंतवाडी येथील आपल्या मूळ घरी गणेशाची पूजा करत पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले.

मालवण येथील आपल्या मूळ घरी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी हजेरी लावत दर्शन घेत गणरायाची मनोभावे पूजा केली. उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक खा. विनायक राऊत हे तर दरवर्षी 11 दिवस गणेशोत्सवात आपल्या घरीच राहणे पसंत करतात. या 11 दिवसांत जवळपास 200 मंडळांची भजने ते करून घेतात. आ. वैेभव नाईक यांनी आपल्या आरोंदा मूळ गावी गणेशाचे पूजन केले व त्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे आपल्या मतदार संघासह इतर गणपतींचेही दर्शन घेणे सुरू ठेवले आहे. भाजपा आ. नितेश राणे यांनीही कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेतले. केंद्रीय मंत्री नारायण राणे बहुधा गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर ना. राणे सिंधुुदुर्गात दाखल होतील, असे बोलले जात आहे.

ठाकरे व केसरकर यांचे परस्परांवर टीकेचे बाण

ठाकरे यांनी गणेश दर्शना दरम्यान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर बोलताना त्यांना किंमत देऊ नका, अशी टीका केली होती. त्या टीकेला केसरकर यांनी मी अजूनही ठाकरे घराण्याचा आदर करतो, मला जास्त बोलायला लावू नका, योग्यवेळी आदित्य ठाकरेंना उत्तर देईन, असे प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे ठाकरे व केसरकर यांचे परस्पर टीकेचे बाण वगळता इतर फारशी राजकीय चर्चा झाली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT