Monsoon Fishing Ban 
रत्नागिरी

Monsoon Fishing Ban : १ जूनपासून यांत्रिक मासेमारी नौकांना ६१ दिवसांची बंदी

पावसाळी हंगामात समुद्रात मासेमारी केल्यास कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : राज्यातील सागरी जैवसंपत्तीचे संवर्धन आणि माशांच्या प्रजनन काळाचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने यावर्षी १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत महाराष्ट्राच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारीस बंदी लागू केली आहे.

तब्बल ६१ दिवस लागू राहणाऱ्या या पावसाळी मासेमारी बंदीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नौकामालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) सा. वि. कुवेसकर यांनी दिला आहे.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत ही बंदी लागू करण्यात आली असून, राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांच्या हद्दीत कोणत्याही यंत्रचलित किंवा यांत्रिक नौकेला मासेमारी करता येणार नाही. सर्व मासेमारी नौकांनी १ जूनपूर्वी बंदरात परतणे बंधनकारक करण्यात आले असून, ३१ जुलैपूर्वी समुद्रात जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. बंदी कालावधीत नियमांचे उल्लंघन करून मासेमारी करताना आढळणाऱ्या नौका, मासेमारी साहित्य आणि मासळी जप्त करण्यात येणार असून, संबंधितांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) २०२१ अंतर्गत कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच या काळात अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व मच्छीमार सहकारी संस्था, नौकामालक आणि सभासदांनी नियमांचे काटेकोर पालन करून बंदी कालावधीत समुद्रात मासेमारी न करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT