Konkan Fishing 
रत्नागिरी

Konkan Fishing : कोकणात सागरी मासेमारीला नौकांना हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ

मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्ट रोजी संपला; सुमारे ७६ दिवसांनी नाैका, ट्रॉलर व मच्छीमार समुद्रात रवाना

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी/देवगड : मासेमारीवरील बंदीचा कालावधी संपल्याने कोकण किनारपट्टीवर पारंपरिक मच्छीमारीला प्रारंभ झाला आहे. सुमारे ७६ दिवसांच्या मासेमारी बंदीनंतर अखेर रविवारपासून रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सागरी मासेमारीच्या नव्या हंगामाला अधिकृत सुरुवात झाली. देवगड बंदरात‍ सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी किरण वाघमारे यांच्या उपस्थितीत नौका मालक, मच्छीमार, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे कर्मचारी आणि सागरी सुरक्षा रक्षक यांच्या उपस्थितीत मासेमारी नौकांना हिरवा झेंडा दाखवून त्यांना समुद्रात रवाना करण्यात आले.

मासेमारी नौकांची विधिवत पूजा करून परिक्रमा करण्यात आली. उपस्थित नौका मालक आणि मच्छीमार बांधवांना पुष्प देऊन नव्या मासेमारी हंगामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हिरवा झेंडा दाखविल्यानंतर टप्प्याटप्प्याने नौका समुद्राच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळी मच्छीमार बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. दीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा समुद्रात जाण्याची संधी मिळाल्याने मच्छीमारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत होता.

यापूर्वी राज्यात १ जून ते ३१ जुलै असा दोन महिन्यांचा मासेमारी बंदी काळ होता. मात्र, मत्स्यसाठ्याचे संवर्धन आणि भविष्यातील उत्पादन वाढीसाठी यावर्षी पासून हा कालावधी १५ दिवसांनी म्हणजेच तो १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या निर्णयामुळे समुद्रातील मत्स्यसाठ्याला वाढीसाठी अधिक वेळ मिळाल्याने आगामी काळात चांगले मत्स्य उत्पादन मिळण्याची अपेक्षा मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात आली. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या या निर्णयाचे स्थानिक मच्छीमारांनी स्वागत केले. अंमलबजावणी अधिकारी किरण वाघमारे यांनी सर्व नौका मालक व मच्छीमारांना शुभेच्छा देत कायद्याचे पालन करून तसेच सागरी सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करत मासेमारी करण्याचे आवाहन केले. सुरक्षितपणे मासेमारी करून सर्वांना चांगले मत्स्य उत्पादन मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांनी विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या नौकांनी संबंधित नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी आवश्यक पास असलेल्या नौकांनीच त्या क्षेत्रात मासेमारी करावी. ज्या नौका विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारी करणार आहेत, त्यांनी आवश्यक पास घेऊनच समुद्रात उतरावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT