रत्नागिरी : कडाक्याची थंडी तसेच अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा, काजू क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आंबा, काजू बागायतदारांनी तातडीने ग्राममहसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फार्मर आयडी, आधारकार्ड, सातबारा उतारा, बँक पासबुक झेरॉक्स ही कागदपत्रे १९ मेपर्यंत जमा करावीत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चालूवर्षी थंडी तसेच अवेळी पावसामुळे आंबा,काजू या फळपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जारी केली होती. त्यानुसार बाधित क्षेत्राचे एनडीआरएफ,एसडीआरफ निकषानुसार तातडीने पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात नुकसानाचे मूल्यमापन अचूक होण्यासाठी महसूल, कृषी ,जिल्हा परिषद विभाग यांच्यामार्फत ग्रामस्तरावर सहायक कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून संयुक्त पंचनामे करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्ती व्यापक स्वरूपाची असून रत्नागिरी जिल्ह्यात आंबा व काजू फळबागांचे उत्पादनक्षम क्षेत्र १ लाख ५६ हजार ९६० इतके आहे. पंचनामे पूर्ण करून तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे बागायतदारांनी १९ मेपर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करा जेणेकरून लाभापासून कोणीही वंचित राहणार नाहीत, असेही आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले.