दापोली : पांगारी विभाग प्रभारी अधिकारी यांचे कार्यालय. 
रत्नागिरी

Hapus Mango : कोकण कृषी विद्यापीठाचे हापूस उत्पन्‍न निम्म्याहून खाली!

वाकवली संशोधन केंद्रांतर्गत पांगारी विभागात यंदा आंबा उत्पादनातून सुरुवातीला जेमतेम ५ लाख; गतवर्षी २३ लाखांचे उत्पन्‍न

पुढारी वृत्तसेवा

दापोली : कोकणातील फळबाग संशोधन आणि रोपवाटिका विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या वाकवली संशोधन केंद्रांतर्गत पांगारी विभागात यंदा आंबा उत्पादनातून सुरुवातीच्या टप्प्यात ४ लाख ८२ हजार रुपयांची विक्री झाली आहे. ८ मे २०२६ पर्यंत एकूण ८ हजार ४१ किलो आंब्याची विक्री झाली असून यामध्ये २०९ किलो केशर आंब्याची ८ हजार ६०० रुपयांची विक्री झाल्याची माहिती कृषी सहाय्यक उदय चव्हाण यांनी दिली.

यंदाच्या हंगामात एकूण ८ ते ९ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले असून ते निम्म्याहून खाली जाण्याची शक्यता आहे. पांगारी विभागात सध्या हापूस आंब्याची ६ हजार २३५ झाडे, केशरची २ हजार ५०० झाडे तर गोवा मानकूर जातीची २६५ झाडे आहेत. मागील वर्षी या बागेतून सुमारे २३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्यावेळी आंबा विक्री लिलाव पद्धतीने करण्यात आली होती.

यंदा आंब्याच्या गुणवत्तेसाठी फळ संरक्षणासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर, तीन वेळा फवारणी तसेच खत व्यवस्थापनाची विशेष काळजी घेण्यात आली. मात्र उत्पादन वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पांगारी विभागाचे एकूण क्षेत्र १७२ हेक्टर असून त्यापैकी ८० हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड, साडेपाच हेक्टरवर भात तर उर्वरित ७२ हेक्टरवर विविध पिके व लागवडी आहेत. विभागातील रोपवाटिकेतून दरवर्षी २८ ते ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामध्ये आंबा रोपांमधून सुमारे २२ लाख, काजू रोपांमधून १० लाख तर इतर रोपांमधून सुमारे ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. भात विक्रीतूनही वर्षाला सुमारे ४ लाख ८६ हजार रुपये मिळतात.

या प्रक्षेत्रात १० पुरुष व १६ महिला असे कायम कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय दररोज २७ ठेका मजूर काम करतात. ठेका मजुरांना प्रतिदिन ४०९ रुपये मजुरी दिली जाते. वर्षभरात सुमारे ६ हजार ५०० ठेका मजूर-दिवसांची, तर कायम कर्मचाऱ्यांकडून सुमारे ३०० कामकाज दिवसांची नोंद होते.

संशोधन, लागवड, रोपवाटिका आणि विविध पिकांमधून उत्पन्न मिळत असले तरी वाढत्या मजुरी, खत, औषधे आणि देखभाल खर्चामुळे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याची बाब कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी नमूद केली आहे. त्यामुळे संशोधन केंद्राच्या आर्थिक व्यवस्थापनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT