रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव असून प्रत्येक कोकणकर गणेशोत्सवासाठी आपल्या गावी येतोच. अवघ्या दोनच दिवसांवर लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे मुंबईहून आपल्या गावी येण्यासाठी यंदाही चाकरमान्यांनी लालपरीलाच पसंती दिली आहे. शुक्रवारपासून चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात येऊ लागले असून शुक्रवार आणि शनिवारी दोन दिवसांत १,७०० बसेस जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे चाकरमान्यांच्या गर्दीमुळे गावे, वाड्या-वस्त्या गजबजल्या आहेत. वर्षभर बंद असलेली दारं उघडली असून साफसफाई करण्यात आली आहे. दरम्यान, आज रविवारी तब्बल १,५०० एसटी बसेस जिल्ह्यात दाखल होणार आहेत.
गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाच्या वतीने मुंबईतून तब्बल ५ हजार २२० एसटी बसेसचे नियोजन केले आहे. त्यापैकी ३ हजार २०० एसटी बसेस रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहेत. सोमवारी गणेश चतुर्थी असल्याने गुरुवारपासून मुंबईतून जादा बसेस सोडल्या असून टप्प्याटप्प्याने बसेस रत्नागिरी जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे एसटी बसस्थानकावर चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली आहे. आलेल्या सर्व गाड्या त्या-त्या आगारात थांबून ठेवण्यात येत आहेत. १९ सप्टेंबर रोजी गौरी-गणपती विसर्जन झाल्यानंतर त्याच गाड्या परतीच्या प्रवासासाठी सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, चाकरमानी मुंबईतून आपल्या गावी परतल्यानंतर बाजारपेठेतून खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. शहरासह तालुक्यातील बाजारपेठेत झगमगाट पाहावयास मिळत आहे. कपडे, मिठाई, डेकोरेशन साहित्य यासह विविध खरेदी रत्नागिरीकर करीत आहेत. एकंदरीत, चाकरमानी परतल्यानंतर शहर, गावे, खेडे, वस्त्या गर्दीने गजबजल्या आहेत.
चोवीस तास दुरुस्ती पथके तैनात
जादा गाड्या कोकणात येत असताना कशेडी ते खारेपाटण या मार्गावर विविध ठिकाणी दुरुस्ती पथके २४ तास तैनात ठेवण्यात आली आहेत. याशिवाय क्रेन, ब्रेकडाऊन वाहनही उपलब्ध केले जाणार आहे.
रत्नागिरी विभागातून हजारो गाड्या कोकणला गेल्या असून टप्प्याटप्प्याने ते जिल्ह्यात येत आहेत. दोन दिवसात संपूर्ण बसेसने चाकरमानी रत्नागिरीत येतील. परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत २ हजारांहून अधिक बसेस बुक झाल्या आहेत. ग्रुप बुकिंगही वाढले आहे.- आश्वजित जानराव, विभाग नियंत्रक, रत्नागिरी