रत्नागिरी ः बोर्डाच्या परीक्षेचे नाव काढले की आजही अनेक विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा येतो आणि पालकांच्या कपाळावर आठ्या पडतात, पण यंदा हे चित्र बदलणार आहे. कोल्हापूर आणि कोकण विभागीय मंडळाने केवळ परीक्षा घेणारे यंत्र ही आपली ओळख पुसून विद्यार्थ्यांचे सारथी बनण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय मार्गदर्शन व्हिडीओ ही अभिनव भेट देऊन बोर्डाने शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवा डिजिटल क्रांतीचा अध्याय सुरू केला आहे.
परीक्षा काळात मार्गदर्शनासाठी विद्यार्थी महागड्या खासगी क्लासेसकडे धाव घेतात. मात्र यंदा खुद्द बोर्डानेच कंबर कसली आहे. कोणत्याही व्यावसायिक हेतूशिवाय, निव्वळ विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे डिजिटल शस्त्र बोर्डाने उपलब्ध करून दिले आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाच्या कार्यालयात या सर्व व्हिडिओंचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, या यूट्यूब चॅनेलवर हे ज्ञानभांडार सर्वांसाठी खुले झाले आहे. ‘माझा अभ्यास तर झालाय, पण उत्तरपत्रिका नेमकी कशी लिहू?’ या प्रश्नाने गोंधळलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ वरदानच आहेत. केवळ पाठांतर गुण मिळवून देत नाही, तर त्या तीन तासांत मिळालेल्या ज्ञानाचे कागदावर अचूक प्रकटीकरण कसे करावे, याचे तंत्र यात शिकवले आहे.
कोकण विभाग राज्यात नेहमीच प्रथम, तर कोल्हापूर विभाग द्वितीय असतो. पण आता या मंडळांना केवळ आकडेवारी नको, तर निकालाचा दर्जा सुधारायचा आहे. यासाठी बोर्ड परीक्षेचा राजमार्ग, सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे ही नियोजन पुस्तिकाही अंमलात आणली गेली आहे. परीक्षा काळातील आहार आणि आरोग्य, मोबाईलचा मर्यादित वापर, तणावमुक्त अभ्यासाच्या टिप्स याही व्हिडीओंचा समावेश करण्यात आला आहे.