कोकणात पहिल्या टप्प्यात आंब्याला 10 टक्केही फळधारणा नाही 
रत्नागिरी

Hapus Mango : कोकणात पहिल्या टप्प्यात आंब्याला 10 टक्केही फळधारणा नाही

आंबा बागायतदार आर्थिक संकटात!

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : कोकणातील आर्थिक कणा असलेल्या आंबा, काजू पिकांवर ढगाळ वातावरण, सततची पडणारी थंडी आणि धुक्यांमुळे रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे जिल्ह्यातील मोहोर काळा पडला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. कोकणात पहिल्या टप्प्यात आंब्याला 10 टक्केही फळधारणा झालेली नाही. मोहोर बहुतांशी करपून खाली पडला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मोहोर आता येत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाला तातडीने नुकसान अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, राज्य शासन आंबा बागायतदारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणातील आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. या वर्षी थंडीमुळे जिल्ह्यातील 80 ते 90 टक्के आंब्याच्या झाडांना मोहोर आला. मोहोराने आंब्याची झाडे बहरली होती. दोन नोव्हेंबरला आलेल्या मोहोराला जानेवारीच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यापर्यंतची फळधारणा झालीच नाही. त्यानंतर ढगाळ वातावरण आणि सततचे धुके यामुळे मोहोर मोठ्या प्रमाणात काळा पडला आहे. कलमे काळवंडली आहेत. आलेल्या मोहोराला दहा टक्केदेखील फळधारणा झालेली नाही. त्यामुळे आंबा बागायतदारांनी खते, किटकनाशकांवर केलेला लाखो रूपये खर्च वाया गेला आहे.

देवगड तालुक्यात या संदर्भातील बैठक झाली होती. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात तज्ज्ञांचा पाहणी दौरा सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मोहोर करपल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील आलेल्या मोहोरामध्ये नर मोहोर अधिक असून, संयुक्त मोहोर कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोकणची शान, अर्थकारणाचा कणा मानल्या जाणारा आंबा हंगाम लांबणीवर पडणार असून बागायतदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आंबा हंगाम एप्रिल, मेपर्यंत लांबणार

सततच्या पावसामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. दुसरीकडे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये चांगली थंडी पडल्यामुळे आंब्यांच्या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. त्यामुळे शेतकरी आनंदात होता. त्यानंतर ढगाळ वातावरण, वाढणारी थंडी, धुके यामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर करपून गेला आहे. 90 टक्के मोहोरलेल्या आंब्याला 10 टक्के देखील फळधारणा झालेली नाही. दुसऱ्या टप्प्यातील मोहोर आता येत आहे. त्यामुळे आंब्याचा हंगाम एप्रिल किंवा मे मध्ये जाण्याची शक्यता आहे.

सततच्या ढगाळ, वातावरण बदलामुळे मोहोरला फटका बसत आहे. काही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. आम्ही तज्ज्ञाची टीम केली असून ते पाहणी करीत आहेत. त्याचा सविस्तर अहवाल कृषी आयुक्तांना पाठवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मोहोरची चांगली वाढ झाली होती. मात्र दुसऱ्या टप्प्यात नर फुलांचे प्रमाण अधिक दिसत आहे. संयुक्त फुलांचे प्रमाण कमी आहे. पूर्ण अहवाल येईपर्यंत आंब्याला किती फटका बसणार, नुकसानीसंदर्भात काहीच सांगता येत नाही. अंतिम अहवालानंतर सर्व माहिती समोर येईल. मात्र, या वातावरण बदलामुळे आंब्याचा हंगाम एप्रिलला जाईल.
शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT