Cashew Cultivation FILE
रत्नागिरी

Cashew Cultivation : कोकणातील शेतकऱ्यांचा काजू लागवडीचा कल वाढतोय

मागील पाच वर्षांत फलोत्‍पादन क्षेत्रात ५ हजार हेक्‍टरची वाढ; आंबा उत्‍पादन, उत्‍पन्‍नाअभावी आता काजू लागवडीवर भर

पुढारी वृत्तसेवा

जाकीरहुसेन पिरजादे

रत्‍नागिरी : कोकणातील रत्‍नागिरी जिल्‍ह्यात आता काजू लागवडीवर भर देण्यात येत आहे. मागील पाच वर्षांत फलोत्‍पादन क्षेत्रात ५ हजार हेक्‍टरने वाढ झालेली आहे. उत्तम हवामान आणि सुपीक मातीमुळे जिल्‍ह्यातील फलोत्‍पादन क्षेत्र सातत्‍याने वाढत आहे. आता आंबा कलमांपेक्षाही काजूच्‍या लागवडीकडील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. आंब्‍याचे उत्‍पादन आणि त्‍यातून मिळणारे उत्‍पन्‍न अस्‍थित असल्‍याने आता बागायतदार काजू लागवडीकडे अधिक वळले आहे. काजू लागवडीस कमी लक्ष द्यावे लागते. तसेच चांगले उत्‍पन्‍न मिळत असल्‍यामुळे काजू लागवडीवर आता भर दिला जात आहे.

रत्‍नागिरी जिल्‍हा फलोत्‍पादन जिल्‍हा म्‍हणून ओळखला जातो. १९९० पूर्वी जिल्‍ह्यात केवळ ३८ हजार ६४४ हेक्‍टर क्षेत्रच फळबाग लागवडीखाली होते. १९९०-९१ मध्ये महाराष्ट्र शासनाने फळझाड लागवडीला १०० टक्‍के अनुदान सुरू केल्‍यानंतर फळझाड लागवड मोठ्या प्रमाणात वाढली. २०२०-२१ या वर्षात जिल्‍ह्यात एक लाख ८१ हजार १६१.२६ हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली होते. गेल्‍या पाच वर्षात जिल्‍ह्याच्‍या लागवडीत ५ हजार ४६३.७४ हेक्‍टर क्षेत्राने वाढ झाली आहे. सन २०२४-२५ मध्ये एकूण एक लाख ८६ हजार ६२५ हेक्‍टर क्षेत्र लागवाडीखाली आले आहे. यामध्ये दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्‍नागिरी, लांजा, राजापूर तालुक्‍यात सर्वाधिक लागवड आहे.

२००९ साली झालेल्‍या फयान वादळात अनेक फळझाडांचे नुकसान झाले, झाडे उन्‍मळून पडली. तोक्‍ते, निसर्ग या चक्रीवादळातही फळबागांचे मोठे नुकसान झाले. तरीही जिल्‍ह्यात शेतकऱ्यांनी हार न मानता लागवड केली व लागवड क्षेत्रात वाढ झाली.

जिल्‍ह्यात सर्वाधिक काजू लागवड

हापूस आंबा उत्‍पादनात जिल्‍हा अग्रक्रमांकावर असला तरी जिल्‍ह्यात सर्वाधिक लागवड काजूची आहे. एक लाख १२ हजार ५५७ हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे. नारळ लागवड ५४००, चिकू १२६, सुपारी १०७० व इतर पिकांची ३८४ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT