देवरुख : उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरहून आलेल्या पर्यटकावर काळाने घाला घातला. सोनवी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या 37 वर्षीय तरुणाचा रविवारी सायंकाळी पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित शंकर बोरगे (रा. राजारामपुरी, शाहूनगर, 13 वी गल्ली, कोल्हापूर) असे मृत पर्यटकाचे नाव आहे.
मिळालेली माहिती अशी की, अजित बोरगे हे त्यांचे मावस भाऊ विनोद मोहन कलकटकी आणि अन्य मित्रांसह कोल्हापूरहून संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथे मित्राच्या आजोळी फिरण्यासाठी आले होते. रविवारी सायं 4 च्या सुमारास ते सर्व लोवले येथे सोनवी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरलेे. यावेळी अजित बोरगे हे पाण्याचा अंदाज चुकल्याने नदी पात्रात खोलवर बुडाले. मित्रांनी त्यांना पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी संगमेश्वर येथील खासगी रुग्णालयात नेले. त्यानंतर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. संगमेश्वर पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद झाली आहे.