दापोली : दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे भात संशोधानात यशस्वी पाऊल पडताना दिसत आहे. शेतकर्यांच्या पसंतीस उतरलेल्या रत्नागिरी आठच्या लोकप्रियतेनंतर विद्यापीठाने कोकण सुहास हे भाताचे नवीन सुवासिक वाण विकसित केले आहे. त्यामुळे कोकण सुहास हे वाण भविष्यात अनेकांच्या जिभेची गोडी वाढवेल, असे दिसत आहे.
2015 साली दापोली कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रात सुपर बासमती या भातबियाण्यांवर गॅमा किरणांची प्रक्रिया करून ‘कोकण सुहास’ ही नवीन सुवासिक जात विकसित करण्यात आली आहे. तर विकसित केलेल्या या भातजातीला महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांच्या 52 व्या संयुक्तकृषी समितीने अकोला येथे झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाने 10 वर्षे केलेल्या यशस्वी संशोधनाला यश मिळाले आहे.
कोकण सुहास ही जात हळवी असून, याचा कालावधी 115 ते 120 दिवसांचा आहे. याचा तांदूळ हा लांबट बासमतीसारखा आहे. या वाणाचे उत्पन्न सरासरी 45 ते 50 क्विंटल प्रतिहेक्टर एवढे येते. या वर्षी या जातीच्या दोनशे किलो बियाण्याची शिरगांव कृषी संशोधन केंद्रात विक्री करण्यात आली आहे. पारंपरिक भात बियाण्यातून मिळणार्या उत्पनातून शेतकर्यांची वर्षभराची धान्याची गरज भागात नाही. त्यामुळे कोकणातील शेतकरी गेली काही वर्षे चांगल्या प्रतीच्या तांदळाचे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यात शेतकर्यांकडून बासमती भातपिकाच्या लागवडीसाठी भातबियाण्यांची संशोधन केंद्रात विचारणा होते. कोकणात खरीप हंगामात भात फुलोर्याला येते तेव्हा तापमानात वाढ झालेली असते. त्यामुळे सुवासिक भाताला कोकणात अपेक्षित वास येत नाही. भाताचा वास हा मुख्यत्वे जमिनीचा प्रकार व तापमान या दोन मुख्य घटकांवर अवलंबून असतो या सर्व बाबींचा विचार करून कोकण कृषी विद्यापीठाने हे वाण विकसित केले आहे, तर हे वाण शेतकर्यांच्या पसंतीसदेखील उतरत आहे.
काही शेतकर्यांनी गेली दोन वर्षे प्रयोग केल्यावर तांदळाचा दर्जा चांगला असल्याचे निष्कर्ष दिले आहेत. त्यामुळे हे वाण नक्कीच शेतकर्यांच्या पसंतीस उतरेल आणि हळवी शेती करणार्या शेतकर्यांना हे पीक घेता येईल.विजय दळवी, कृषी संशोधन केंद्र, शिरगाव, रत्नागिरी