Shimgotsav 2025 | रत्नागिरीत तेरसे शिमग्याचा नाद घुमला file photo
रत्नागिरी

पालखी भेट..., होळी उभी करणे... अन् फिरते खेळ...; रत्नागिरीत तेरसे शिमग्याचा नाद घुमला

Shimgotsav 2025 | प्रत्येक गावात वेगवेगळ्या प्रथा; ओस पडलेली खेडी गजबजली

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : Shimgotsav 2025 | कोकणातील सर्वात मोठा सण आणि कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला शिमगोत्सवाला खर्‍या अर्थाने मंगळवारपासून (दि. ११) सुरुवात झाली आहे. मंगळवारी गावोगावी तेरसे शिमगे रंगलेले पहायला मिळाले. तर काही ठिकाणी भद्रेचे शिमगे १४ तारखेला होणार आहेत. ठिकठिकाणी पालखी भेट, होळी उभी करणे, फिरते खेळ पहायला मिळत असून, संपूर्ण कोकणातील वातावरण ढोल-ताशांच्या गजराने घुमत आहे.

रत्नागिरीत तेरसे शिमगा

गेल्या अनेक वर्षाची परंपरा, चालीरिती यातून साजरा होणार्‍या शिमगोत्सवाला गेल्या आठ दिवसांपासून सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी फाका घुमू लागल्या आहेत. या शिमगोत्सवाला खर्‍या अर्थाने मंगळवारपासून रंग चढला आहे. तेरसे शिमग्याला सुरुवात झाली आहे. मंगळवारी अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक गावात वेगवेगळ्या प्रथेपरंपरेनुसार हा उत्सव साजरा केला जातो.

या कालावधीत गावोगावी ग्रामदेवतांच्या पालख्या घरभेटी निघतात. फिरते खेळे, संकासूर, गोमू आदी विविध प्रकार साजरे केले जातात. पालख्यांची भेट हा पण एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम असतो. होळी तोडली जाते. त्यामध्ये आंबा, शिवर यांचा समावेश असतो. ती तोडलेली होळी गावात आणून त्याची विधीवत पूजा केली जाते.

ओस पडलेली खेडी गजबजली

या शिमगोत्सवाला चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होतात. कोकणात गणपती उत्सवानंतर शिमगा उत्सव हा मोठा सण आहे. यासाठी बाहेरगावी गेलेले चाकरमानी या उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आपल्या गावाकडे धाव घेताना दिसतात. यामुळे ओस पडलेली खेडी यानिमित्त गजबजून गेली आहेत. ग्रामदेवतेच्या जयजयकाराने आणि ढोलताशांच्या आवाजाने परिसर दुमदुमून जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT