खेड : शहरातील महाविकास आघाडीच्या बॅनरवर झळकलेले अजित पवारांचे फोटो व राष्ट्रवादीचे घड्याळ. Pudhari Photo
रत्नागिरी

Political News | कोकणात नवा राजकीय संग्राम सुरु!

खेडमध्ये बॅनरवर शरद पवार व अजित पवार एकत्र झळकले; महायुतीत माजलेय खळबळ

पुढारी वृत्तसेवा

अनुज जोशी

खेड :

राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. कोकणात महायुतीतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची प्रत्यक्ष निर्गम होत महाविकास आघाडीच्या गोटात प्रवेश झाल्याचे चित्र आता उघडपणे स्पष्ट झाले आहे. खेड नगरपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले.

यावेळी झळकलेल्या बॅनरवर शरद पवार व अजित पवार यांच्या एकत्रित छायाचित्रांनी ‘कोकणात नवा राजकीय संग्राम’ सुरू झाल्याचे संकेत मिळाले. उत्तर रत्नागिरीतील गृहराज्यमंत्री योगेश कदम व शिवसेना नेते रामदास कदम यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेल्या या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जिल्ह्यात महाविकास आघाडीत अजितदादांच्या राष्ट्रवादीला स्पष्टपणे स्थान मिळाले असून, कोकणातील राजकारणाचे समीकरण यामुळे मोठ्या प्रमाणात ढळणार असल्याचे निरीक्षण आहे. उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित राहून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांनी महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या वाढत्या अहंकारामुळेच कोकणातील जनता पर्याय शोधू लागली असल्याचा आरोप केला.

‘येणार्‍या निवडणुकीत चित्र नक्कीच बदलेल आणि मतदार महायुतीला योग्य धडा शिकवतील’ असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या घडामोडींमुळे खेड नगरपरिषद निवडणूक अधिक चुरशीची होण्याचे स्पष्ट झाले असून, महायुतीतून राष्ट्रवादीच्या बाहेर पडण्याचा राजकीय प्रभाव कोकणभर जाणवणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT