रत्नागिरी : स्वायत्त कोकणासाठी गुरुवारपासून आंदोलन छेडले जाणार आहे. हे आंदोलन ऐतिहासिक ठरणार असल्याची माहिती समृद्ध कोकण संघटनेचे अध्यक्ष प्रशांत यादवराव यांनी दिली. ते शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की, कोकणातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी ९ वा. हातखंबा येथून अंबर हॉलपर्यंत रॅली काढण्यात येणार असून, त्यानंतर अंबर हॉल येथे स्वायत्त कोकण परिषद पार पडणार आहे. यामध्ये पर्यटन, आंबा बागायतदार, शेती, मच्छीमार, युवक कोकणावर होणाऱ्या अन्यायाबाबत चर्चा व स्वायत्त कोकण याविषयी जाहीरनामा जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे.
त्यानंतर दुपारनंतर कोकणातील आंबा मच्छीमारांना कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे यादवराव यांनी सांगितले. कोकण हा राज्यासह देशाचा विकासाचा कणा आहे. मात्र, कोकणाकडे प्रत्येक सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप यादवराव यांनी यावेळी केला. आंबा काजू बोर्ड सुरू नाही. पर्यटनासाठीचा निधी कुठे वापरला जातो, असा असा सवाल उपस्थित करीत माकडांची समस्या, गावांमधील ५० टक्के घरे बंद आहेत. त्यामुळे हे आदोलन करण्यात येणार असल्याचे यादवराव यांनी स्पष्ट केले.