चिपळूण शहर : खेर्डी गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कचरा प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून खेर्डी गावासाठी एमआयडीसी परिसरात कचरा प्रकल्प उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे गावातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सुटण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
खेर्डी येथील कातळवाडी परिसरात पूर्वी कचरा प्रकल्प सुरू होता. मात्र हा प्रकल्प अनेक वर्षांपासून बंद असल्याने गावातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. वाढती लोकसंख्या, दैनंदिन निर्माण होणारा कचरा आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असलेली व्यवस्था यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. गावाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे आवश्यक बनले होते.
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन युवासेना सरचिटणीस (रायगड रत्नागिरी लोकसभा) उमेश खताते यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. याच अनुषंगाने त्यांनी ना. सामंत यांची भेट घेऊन खेर्डी गावासाठी एमआयडीसी परिसरातील बंद पडलेल्या प्लॉटवर कचरा प्रकल्प उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन सादर केले.
या मागणीवर सकारात्मक चर्चा करताना मंत्री उदय सामंत यांनी संबंधित आरओ अधिकाऱ्यांना आवश्यक प्रशासकीय कागदपत्रे तयार करण्यास तसेच आवश्यक ठराव व प्रक्रियेची पूर्तता करण्याबाबत सूचना दिल्या. एमआयडीसी परिसरातील बंद पडलेल्या प्लॉटमधून खेर्डी गावाच्या कचरा प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. तसेच, केवळ जागा उपलब्ध करून देण्यापुरता हा विषय मर्यादित न ठेवता कचरा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असलेला निधीही कमी पडू देणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आगामी काळात जागा उपलब्ध होणे, प्रशासकीय मंजुरी मिळणे आणि प्रकल्पाच्या उभारणीची प्रक्रिया पूर्ण होणे, या बाबींना गती मिळेल.
या संपूर्ण विषयासाठी उमेश खताते यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी दाखविलेली सकारात्मक भूमिका यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाच्या निराकरणाची प्रक्रिया पुढे सरकत आहे. आता आवश्यक प्रशासकीय कागदपत्रे, अधिकृत मंजुरी आणि जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खेर्डी गावासाठी कचरा प्रकल्प उभारण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.