Kharghar Water Crisis Pudhari
रत्नागिरी

Khed Ratnagiri Water Crisis | खेड तालुक्यात 13 गावांतील 28 वाड्यांत भीषण पाणीटंचाई

Khed Ratnagiri Water Crisis | शासकीय टँकर नादुरुस्त, महिलांसह ज्येष्ठ नागरिकांवर लांब अंतरावरून पाणी आणण्याची आलेय वेळ

पुढारी वृत्तसेवा

खेड : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील १३ गावांमधील २८ वाड्यांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. प्रशासनाकडून पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध असलेला एकमेव शासकीय टैंकर मंगळवारी नादुरुस्त अवस्थेत आढळल्याने टंचाईग्रस्त भागातील नागरिकांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

पंचायत समिती खेडच्या अहवालानुसार तालुक्यातील विविध गावांतील २८ वाड्यांना शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र मंगळवारी दिवसभरात या टँकरने एकही फेरी मारली नसल्याने अनेक गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागले अनेक ठिकाणी महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना लांब अंतरावरून पाणी आणण्याची वेळ आली आहे.

सह्याद्रीच्या दुर्गम डोंगररांगांमध्ये वसलेल्या धनगरवाड्यांमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. नैसर्गिक जलस्रोत आटल्याने या भागातील ग्रामस्थांची संपूर्ण भिस्त टँकरवर आहे. मात्र टँकरच बंद पडल्याने अनेक कुटुंबांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुर्गम भागातील नागरिकांनी शासनाने तातडीने पर्यायी टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, जून महिना सुरू होऊनही पावसाची कोणतीही ठोस चाहूल लागत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हवामान खात्याने कोकणात मान्सून सुमारे १२ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला असल्याने पाणीटंचाईची झळ बसलेल्या भागांतील ग्रामस्थ अधिकच धास्तावले आहेत. पुढील काही दिवस पाऊस लांबल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टंचाईग्रस्त भागांतील नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन अतिरिक्त टँकर उपलब्ध करून द्यावेत, नादुरुस्त शासकीय टैंकर तातडीने दुरुस्त करावा तसेच दुर्गम धनगरवाड्यांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. या पाणीसंकटामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT