अनुज जोशी
खेड : खेड नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 6 हा शहराच्या मध्यवर्ती आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला भाग मानला जातो. नारिंगी नदीकिनाऱ्यापासून सम्राट अशोक नगरपर्यंत पसरलेल्या या परिसराला कधीकाळी ‘शहराचा ग्रीन कॉरिडॉर’ म्हणून ओळखले जायचे. मात्र आज हा परिसर अतिक्रमण, कचरा आणि अपूर्ण कामांची कहाणी बनून राहिला आहे.
या प्रभागाची एकूण लोकसंख्या 1909 असून त्यापैकी अ. जा. 215 व अ. ज. 28 नागरिक आहेत. उत्तरेला प्रभाग क्र.1, पूर्वेस प्रभाग क्र.5, दक्षिणेस प्रभाग क्र.7, तर पश्चिमेस नारिंगी नदी ही नैसर्गिक हद्द आहे. या प्रभागात सम्राट अशोक नगर, न. प. दवाखाना परिसर, संतसेना नगर, पदुमले वाडी, एकविरा नगर, पी. डब्ल्यू. डी. ऑफिस, योगायोग सोसायटी परिसर हे मुख्य भाग समाविष्ट आहेत.
कधीकाळी नारिंगी नदीकाठच्या या परिसरात झाडांनी नटलेली हिरवाई होती, परंतु गेल्या दोन दशकांत पालिकेच्या दुर्लक्षामुळे या हरितपट्ट्यालगत अनेक बांधकामे व अतिक्रमणे झाली आहेत. नागरिक म्हणतात, ‘नदीकाठच्या हिरवळीत जेथे पक्षी खेळायचे, तिथे आज काँक्रीटचे जंगल उभे आहे.’ पालिकेने नियोजनाशिवाय परवानग्या दिल्याने पर्यावरणीय समतोल पूर्णतः बिघडला आहे.
पालिकेच्या नळपाणी योजनेचे काम या भागात काही महिन्यांपूर्वी सुरू झाले. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची पुनर्बांधणी न केल्याने आज बहुतेक रस्ते खोदलेले, खड्डेमय आणि धुळीने झाकलेले आहेत. या परिसरातील पालिकेचे प्रसुतिगृह पूर्णपणे बंद झाले असून दवाखाना मरणासन्न अवस्थेत आहे. कोविड साथीत याच ठिकाणी लाखो खर्च करून कोरोना संक्रमितांच्या विलगीकरणासाठी केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. मात्र त्यावर खर्च झालेला निधी व पुरवलेल्या साहित्याची अखेर धूळधाण झाली. एवढा निधी खर्चून जर पालिकेने प्रसूतिगृह सुरू ठेवले असते तर मध्यम व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना मूल जन्माला येताना आज खासगी रुग्णालयात आर्थिक भुर्दंड सोसावा लागला नसता.
या प्रभागात निवासी व व्यापारी संकुलांची उभारणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र अनेकठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी पालिकेच्या नियमांची पायमल्ली केल्याचे आरोप आहेत. सांडपाणी निचरा, पार्किंग व्यवस्था, वीज व पाणी जोडणी या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून उभारलेल्या इमारतींमुळे शहर नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे अनेक भागात कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कचरा व्यवस्थापन, सांडपाणी निचरा आणि रस्ते देखभाल या मूलभूत सुविधा पूर्णपणे विस्कळीत आहेत. कोट्यवधी रुपयांच्या कामांची घोषणा झाली असली तरी सुमारे नव्वद टक्के प्रकल्प रखडलेले आहेत. नागरिकांची आता ‘विकासाची आश्वासने नकोत, ठेकेदार आवरा’ अशी भावना आहे.
प्रभाग क्र. 6 मधील नागरिक आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामांची मागणी करत आहेत. हरित पट्टा पुन्हा निर्माण करणे, अतिक्रमण हटवणे, रस्त्यांची दुरुस्ती व कचरा व्यवस्थापन सुधारणा हे सर्व विषय नागरिकांसाठी आज प्राधान्याचे झाले आहेत. पालिकेने आणि लोकप्रतिनिधींनी या भागाकडे आता तरी गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.